Pakistan lawmaker Slams Own Nation Mention India: पाकिस्तानमधील खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी भारत आणि पाकिस्तानची तुलना करताना आपल्या देशातील सरकारबरोबरच धोरणकर्त्यांना आरसा दाखवला आहे. भारताच्या चंद्र मोहिमेचा उल्लेख करताना कराचीमधील स्थिती कशी आहे यावर खोचक पद्धतीने कमाल यांनी मत नोंदवलं आहे. मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (एमक्यूएम-पी) पक्षाचे नेते असलेल्या कमाल यांनी भारताने चंद्रावर त्यांचं यान उतरवलं आहे असं सांगिताना आपल्याकडे कराचीमध्ये मात्र आजही मुलं गटारामध्ये पडून मरत आहेत, अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त केला.


आपली मुलं गटारात पडून मृत्यूमुखी पडतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"एकीकडे जग चंद्रावर जात आहे तर आजही आपल्याकडे कराचीमधील पस्थिती अशी आहे की आपली मुलं गटारांमध्ये पडून प्राण गमावत आहेत. एकाच स्क्रीनवर भारत चंद्रावर उतरला आणि दुसऱ्याच क्षणी तिथेच कराचीमधील खुल्या गटारामध्ये पडून मुलं मरण पावल्याची बातमी दिसते," असं कमाल यांनी पाकिस्तानी संसदेला संबोधित करताना म्हटलं. कमाल यांचं हे भाषण 15 मे रोजी झाला. कमाल यांनी याच भाषणामध्ये कराचीसारख्या शहरात पिण्यासाठी स्वच्छ पाणीही उपलब्ध नसल्याचा दावा केला. एका अहवालाचा संदर्भ देत, कराचीमध्ये 70 लाख तर संपूर्ण पाकिस्तानमध्ये 2.6 कोटी मुलं शाळेत जात नाही, असंही अधोरेखित केलं.


15 वर्षांपासून पिण्याचं पाणी नाही


"कराची हे शहर पाकिस्तानला कमाई करुन देणारं शहर आहे. पाकिस्तानच्या स्थापनेपासून जी बंदरं कार्यरत आहेत ती दोन्ही कराचीमध्ये आहेत. आपण (कराची शहर) पाकिस्तानसाठी मध्ये आशियापासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांचे प्रवेशद्वार आहोत. मागील 15 वर्षांपासून कराचीला पिण्यायोग्य पाण्याचा एक थेंबही देण्यात आलेला नाही. जे काही पाणी येतं ते सुद्धा टँकर माफिया कराचीमधील लोकांना विकतात," असं कमाल म्हणाले.


...तर पाकिस्तानी नेत्यांना नीट झोप येणार नाही


"आपल्याकडे एकूण 48 हजार शाळा आहेत. मात्र नव्या अहवालामध्ये 11 हजार शाळांमध्ये कोणीच जात नाही असं दिसून आलं. सिंध प्रांतात 70 लाख मुलं शाळेत जात नाहीत. देशातील एकूण 2 कोटी 62 लाख विद्यार्थी शाळेत जात नाहीत. आपण यावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्या देशातील नेत्यांना नीट झोपही येणार नाही," असं कमाल यांनी पाकिस्तानी संसदेतील भाषणात म्हटलं.


भारताचं चांद्रयान तर पाकिस्तानची आर्थिक चणचण


2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात भारताची चांद्रयान-3 मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारी पहिली भारतीय मोहीम ठरली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. दुसरीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून त्यांच्यासमोर अनेक आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत.