नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये, असणारं नातं सर्वज्ञात आहे. वर्षानुवर्षे या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा तणाव कधीही लपून राहिलेला नाही. पण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की पाकिस्तानात असं एक हिंदू कुटुंब आहे, जिथं या कुटुंबाला समाजात मानाचं स्थान आहे. (India Pakistan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमरकोट प्रांताचे राजा करणी सिंह 
आपण इथे ओळख करुन घेत आहोत, उमरकोट प्रांताचे राजा करणी सिंह सोढा यांची. हमीर सिंह सोढा यांचे हे सुपुत्र. पाकिस्तानी राजवटीमध्ये त्यांच्या कुटुंबाला मानाचं स्थान आहे. 


करणी सिंह यांचा पाकिस्तानात असा प्रभाव आहे, की त्यांच्या रक्षणासाठी सतत सुरक्षारक्षकांचा वेढा असतो. 


अकबराची जन्मभूमी, उमरकोट 
उमरकोटची आधीची ओळख म्हणजे अमरकोट. पाकिस्तानातील सिंध प्रांतात हे ठिकाण आहे. अमरकोटला मुघल सम्राट अकबराची जन्मभूमी म्हणूनही ओळखलं जातं. हे ठिकाण आधी, सिंध प्रांताची राजधानी होती. 


मध्यकाळापासून ते 1947 च्या भारत पाकिस्तान फाळणीपर्यंत उमरकोट प्रांतावर हिंदू सोढा राजपुतांचं शासन होतं. 


फाळणीच्या वेळी पाकिस्तानातच राहण्याचा निर्णय 
मुघल साम्राज्य आणि ब्रिटीश राजवट असताना या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. असं म्हटलं जातं की, अकबराचे वडील, हुमायूँ हे शेरशाह सूरीच्या हाती पराभूत झाले. 


तेव्हा उमरकोटचे राजपूत शासक राणा राव सिंह यांनी त्यांना शरण दिलं. फाळणीच्या वेळी हिंदू बहुसंख्याक उमरकोट हे एकमेव असं संस्थान होतं जे पाकिस्तानात गेलं. 


पाकिस्तानी राजकारणात महत्त्वं... 
करणी सिंह यांचे आजोबा, चंद्र सिंह हे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या संस्थापकांपैकी एक आहेत. 


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकर अली भुत्तो यांच्या खास मित्रांपैकी ते एक, त्यांनी बेनजीर भुत्तो यांच्या कारकिर्दीत महत्त्वाची मंत्रीपदं सांभाळली. 


उमरकोटमधून ते 7 वेळा पाकिस्तानाची संसदेत निवडून गेले होते. पीपीपीपासून वेगळं झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तान हिंदू पार्टीची सुरुवात केली. 


करणी सिंह यांची पत्नी, ठाकूर मान सिंह कनोटा यांची कन्या, पद्मिनी कुमारी यासुद्धा कायम चर्चेत असतात. 


त्यांचा राजेशाही थाट, देखणं रुप आणि त्याहीपलीकडे जाऊन पतीसोबतचा वावर कायमच लक्ष वेधणारा ठरतो. 



खुद्द करणी सिंह हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. पाकिस्तानमधील अनेक राजकीय कार्यक्रमांना त्यांची हजेरी असते. करणी सिंह जातील तिथे त्यांच्याभोवकी रक्षकांचा गराडा असतो.



सुरक्षेची सर्व जबाबदारी सांभाळणाऱ्यांमध्ये बहुतांशी रक्षक हे मुस्लिम आहेत. करणी सिंह यांचं कुटुंब, हे राजा पुरू (पारस)यांचे वंशज आहेत. 


परिणामी त्यांच्या संरक्षणात कोणतीही हेळसांड केली जात नाही.