लडाख आणि जम्मू काश्मीरच्या द्विभाजनावर टीका करणाऱ्या चीनला भारताने सुनावलं
चीनला भारताचं तोडीस तोड प्रत्युत्तर
नवी दिल्ली : लडाख आणि जम्मू काश्मीरच्या द्विभाजनावर टीका करणाऱ्या चीनला भारताने तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. हा निर्णय सर्वस्वी भारताचा अंतर्गत प्रकरणाचा आहे. त्यात कोणाचाही हस्तक्षेप गरजेचा नाही, असं भारताने ठणकावलं आहे. तसंच चीननेच लेह लडाख आणि जम्मू काश्मीरचा काही हिस्सा अनधिकृतरित्या गिळंकृत केला आहे, असंही भारताने सुनावलं आहे.
चीनने गुरुवारी जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विभाजनाला गैरकायदेशीर आणि निरर्थक असल्याचं म्हटलं होतं. चीनने म्हटलं होतं की, भारताकडून चीनचा काही भाग आपल्या प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रात घेणं बीजिंगच्या संप्रभुतेला आव्हान आहे. यावर भारताने उत्तर देताना चीनला ठणकावलं की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अभिन्न भाग आहे. याबाबत बोलण्याचा अधिकार इतर कोणत्याही देशाला नाही.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं की, 'चीन या मुद्द्यावर भारताच्या स्पष्ट भूमिकेशी चांगलाच परिचित आहे. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर चीनसह इतर कोणत्याही देशांनी यावर प्रतिक्रिया देण्याचं कोणाला अधिकार नाही. भारत देखील कोणाच्या अंतर्गत प्रकरणावर बोलणं टाळतो.'