नवी दिल्ली : पाकिस्तानच्या नापाक कारवायांना आता सडेतोड उत्तर देण्याची मागणी सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. पाकिस्तानच्या चिंधड्या उडवा अशी प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटत आहे. पाकिस्तानला 'त्राही भगवान करून सोडा' अशी मागणी केली जात आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तान लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीमेवरील काही आघाडीवरील चौक्यांना भेटी दिल्याची माहिती 'झी मीडिया'ला मिळाली आहे. जानेवारीत २० आणि फेब्रुवारीत असे पाच पाहणी दौरे झाले. यात लेफ्टनंट जनरल किंवा मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांनी छांब, गुलटारी, बाघ, मुजफ्फराबाद, हाजी पीर आणि कोटली सेक्टरमधील चौक्यांना दौरा केल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी आर्मीच्या २३, १६, १२, ७ आणि ६ या विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा सीमावर्ती भागाचा दौरा केला. या सर्व विभागातून दहशतवाद्यांची लॉन्च पॅड कार्यरत आहेत. या सर्व भागात पाकिस्तानी लष्कर हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय. दहशतवादी कारवायांची जबाबदारी पाकिस्तानी लष्कराच्या १० व्या कोअरवर आहे.


पाकिस्तानच्या उलट्या बोंबा


पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने उलट्या बोंबा मारायला सुरूवात केलीय. पुलवामा हल्ल्याबाबत चौकशी न करताच पाकिस्तानवर आरोप करणं तातडीने थांबवा अशी बोंबाबोंब पाकिस्तानने सुरू केलीय. जैश ए मोहम्मद या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. जैश ही दहशतवादी संघटना पाकिस्तानतून कार्यरत आहेत, तिचा म्होरक्या मसूद अझर हा पाकिस्तानात मोकाट फिरत आहे. तरीही पाकिस्तान म्हणतंय की पाकिस्तानवर आरोप नकोत यातून पाकिस्तानचे नापाक इरादे दिसून येतात.  


पुलवामात ४४ जवानांना हौतात्म्य


पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांना हौतात्म्य आलं. या हल्ल्याने अनेक संसार उद्ध्वस्त केले. अनेक स्वप्न एका क्षणात नष्ट झाली. देशाच्या रक्षणासाठी निघालेले तरूण सैनिक अवघ्या काही सेकंदाच हुतात्मा झाले. कोणाच्या घरी वृद्ध माता पिता आपल्या मुलाची वाट पाहात होते, कोणाची पत्नी पतीच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती, काही सैनिकांनी तर आपल्या नवजात बाळाचा चेहराही पाहिला नव्हता... मात्र देशरक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन हे वीर निघाले आणि हुतात्मे झाले.


शत्रूही एवढा भ्याड की आमच्या शूरवीर जवानांशी थेट समोरासमोर लढण्याची हिंमतही दाखवली नाही. स्फोटकांनी खचाखच भरलेली गाडी या जवानांच्या बसवर आदळवण्याचा भ्याडपणा दहशतवाद्यांनी दाखवला. या हुतात्म्यांची पार्थिव आता तिरंगा अभिमानाने लेवून आपल्या घराकडे निघाली आहेत. आज सर्व देश त्यांना सलाम करतोय. पाणावलेल्या डोळ्यात राग, क्रोध, संताप आहे. आता देशाला हवा आहे बदला... जवान हुतात्मा झाले आणि अमर झाले. पण आता हे बलिदान व्यर्थ न जाऊ देण्याची जबाबदारी या देशाची आहे... भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणं, दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशाला जन्माची अद्दल घडवण्याची वेळ आलीय. प्रत्येक देशवासीय या शहीद शूरजवानांचं हौताम्य विरसणार नाही.