Baltimore Bridge Collapse: अमेरिकेतील बाल्टीमोर शहरात मालवाहू जहाजाने धडक दिल्यानंतर पटाप्सको नदीवरील ऐतिहासिक पूल फ्रान्सिस स्कॉट की कोसळला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या जहाजावर भारतीय कर्मचारी होते. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रसंगावधान दाखवणाऱ्या भारतीय क्रू मेंबर्सचं कौतुक करत आभार मानले आहेत. पण असं असताना दुसरीकडे मात्र वर्णद्वेषी कार्टूनमधून भारतीयांची खिल्ली उडवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंगापूरचा ध्वज असणारं हे कंटेनर नियंत्रण सुटल्याने ब्रिजला आधार देणाऱ्या काँक्रीटच्या खांबाला जाऊन आदळलं. यानंतर काही सेकंदात जवळजवळ संपूर्ण पूल कोसळला. हा ब्रीज जवळपास 50 फूल खोल पाण्यात गेला असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर जो बायडन यांनी क्रूचं कौतुक केलं आहे, ज्यामध्ये भारतीय जास्त होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने अधिकाऱ्यांनी ब्रीजवरील वाहनांची वाहतूक थांबवली आणि अनेकांचे प्राण वाचले असं ते म्हणाले. 


पण दुसऱ्या दिवशीच अमेरिकेतील वेबकॉमिकने या घटनेचं चित्रण करणारे व्यंगचित्र शेअर केले. ॲनिमेटेड व्हिडीओमध्ये त्यांनी लंगोट घातलेले कर्मचारी अपघाताआधी घाबरलेले दाखवले आहेत. यामधून त्यांनी भारतीय क्रू मेंबर्सवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. 


'दुर्घटनेआधीचं अखेरचं रेकॉर्डिंग,' असं म्हणत त्यांनी हा ग्राफिक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये ऑडिओही देण्यात आला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांमधील संभाषण दाखवण्यात आलं आहे. इंग्लिशमध्ये बोलत असले तरी त्यांचे उच्चार मात्र भारतीय आहेत. 



हे ग्राफिक व्हायरल झालं असून 4.2 मिलियन व्हूज आणि 2 हजारांहून अधिक कमेंट्स आहेत. पण या ग्राफिकवरुन संताप व्यक्त होत आहे. यामध्ये ज्याप्रकारे भारतीयांचं चित्रण दाखवण्यात आलं आहे फक्त यावरच आक्षेप घेण्यात आलेला नसून, त्यांना कमी लेखण्यात आल्याचाही संताप व्यक्त होत आहे. 


हे व्यंगचित्र शेअर करताना भारतीय अर्थशास्त्रज्ञ संजीव सन्याल यांनी लिहिलं आहे की, घटनेच्या वेळी स्थानिक कर्मचाऱ्याने जहाज चालवलं होतं. "ज्यावेळी जहाज पुलावर आदळले तेव्हा त्यात स्थानिक कर्मचारी ते चालवत होता. त्यांनी अधिकाऱ्यांना सावध केलं होतं, त्यामुळेच मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते. मेयरने तर त्यांचे आभार मानले असून भारतीय क्रू मेंबर्सना "हिरो" म्हटलं आहे," याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.


पूजा नावाच्या एका युजरनेही यावर संताप व्यक्त केला आहे. भारतीय क्रूची या दुर्घटनेसाठी खिल्ली उडवलं जाणं लाजिरवाणं आहे. स्वत: मेयरने कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं असल्याचं तिने म्हटलं आहे.



दरम्यान पूल कोसळल्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण बाल्टिमोर हे कार आणि जड शेती उपकरणांसह देशातील सर्वात मोठे वाहन हाताळणारे बंदर आहे. बंदरातून दररोज सुमारे 100 ते 200 दशलक्ष डॉलर्सचा व्यवहार होतो.