कान्सास : अमेरिकेतील कान्सासमध्ये एका भारतीय डॉक्टरची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अच्युत रेड्डी असे या मृत डॉक्टरचे नाव असून त्यांच्या रुग्णालयातील एका तरुणानेच ही हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रेड्डी यांची हत्या बुधवारी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत भारतीयांच्या हत्या होण्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे. याच वर्षी फेब्रुवारीत श्रीनिवास यांची हत्या करण्यात आली होती. अच्युत रेड्डी आणि श्रीनिवास हे दोघेही मूळचे तेलंगणाचे आहेत. 


रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाचे नाव उमर राशिद दत्त असे असल्याचे वृत्त कान्सासमधील एका वाहिनीने दिले आहे. रेड्डी यांच्यावर त्यांच्याच रुग्णालयात हल्ला करण्यात आला. हल्लेखोराच्या तावडीतून ते कसेबसे निसटले. पण हल्लेखोराने पाठलाग करून त्यांच्यावर चाकूने वार केले. हत्या केल्यानंतरही राशिद रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये रस्त्यावर फिरत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी काही वेळातच त्याला अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


संशयित आरोपी राशिदची आई भारतीय असून हा हैदराबाद येथील रहिवासी आहे आणि त्याच्या वडिलांचे नातेवाईक बंगळूर मध्ये राहतात, अशी माहिती हाती लागली आहे. 


अच्युत रेड्डी यांनी १९८६ मध्ये हैदराबाद येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९८९ मध्ये ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यानंतर रेड्डींनी तेथे हॉलिस्टिक सर्व्हिस नावाचे रुग्णालय सुरू केले. रेड्डी यांच्या पश्चात त्यांची पत्नी बीना रेड्डी आणि तीन मुले आहेत. त्याचबरोअबर त्यांचे आई-वडीलही त्यांच्यासोबतच राहतात.