बैसाखीसाठी महिला पाकिस्तानात... `इस्लाम` कबूल करून केला `निकाह`
पाकिस्तानात बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी गेलेल्या एका भारतीय शिख महिलेनं लाहोरमध्ये एका व्यक्तीशी विवाह केलाय... तसंच तिनं इस्लाम धर्मही स्वीकारलाय. आपल्या व्हिजाची तारीख वाढवण्यासाठीही तिनं अर्ज दाखल केलाय.
इस्लामाबाद : पाकिस्तानात बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी गेलेल्या एका भारतीय शिख महिलेनं लाहोरमध्ये एका व्यक्तीशी विवाह केलाय... तसंच तिनं इस्लाम धर्मही स्वीकारलाय. आपल्या व्हिजाची तारीख वाढवण्यासाठीही तिनं अर्ज दाखल केलाय.
स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील रहिवासी मनोहर लाल यांची मुलगी किरण बाला हिनं पाकिस्तानी परदेश विभागाकडे व्हिजाची तारीख वाढवण्यासाठी अर्ज केलाय. आपण लाहोरचा रहिवासी असलेला मोहम्मद आझमशी विवाह केल्याचंही तिनं या अर्जात नमूद केलंय.
नावही बदललं
किरण आणि आझमचं लग्न गेल्या 16 एप्रिल रोजी जामिया नसीमिया शिक्षण संस्थानामध्ये पार पडलं. किरणनं आपलं नाव बदलून आमना बीबी असं केलंय. तिनं परदेश मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात याच नावाचा उल्लेख केलाय.
सद्य स्थितीत आपण भारतात पुन्हा परतू शकत नाहीत आणि आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे व्हिजाची तारीख वाढवण्याची गरज या महिलेनं व्यक्त केलीय. परदेश विभाग किंवा भारतीय उच्चायोगानं या पत्राबद्दल काहीही म्हटलेलं नाही.
किरण गेल्या 12 एप्रिल रोजी इतर शिख श्रद्धाळूंसोबत पाकिस्तानात दाखल झाली होती. इथं तिला इस्लामाबादनजिक हसन अब्दाल भागातील गुरुद्वारा पांजा साहबच्या बैसाखीच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. तिचा व्हिजा 21 एप्रिलपर्यंत वैध आहे.