लंडन : बेल्जियममध्ये कोरोनाग्रस्तांनी १ लाखांचा टप्पा पार केला आहे. येथील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख २ हजार २९५ वर गेली. रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. कोरोनाबाबतच्या सरकारनं लागू केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. 


मेक्सिको जगात चौथा क्रमांक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेक्सिकोतील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ लाखांच्या घरात पोहोचली आहे. कोरोनामुळे मेक्सिकोत ७३ हजार ६९७जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात आठवड्यांपासून येथील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं घट होत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मृत्यूदराच्या बाबत मेक्सिकोचा जगात चौथा क्रमांक लागत आहे.


स्कॉटलंडमध्ये कोरोनाचे प्रमाण 


स्कॉटलंडमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्कॉटलंडमध्ये लवकरच अतिरिक्त निर्बंध लादण्यात येतील, असा इशारा निकोल स्टर्जन यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन याच्याशीही चर्चा केली आहे. 


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत म्यानमारमधील सर्वात मोठे शहर यँगॉनमध्ये स्टे अॅट होमचे आदेश देण्यात आलेत. कर्मचाऱ्यांनाही वर्कफ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मागील लॉकडाऊन प्रमाणे शाळाही बंद केल्यात तसेच युझाना प्लाझा सारखी बाजारपेठही बंद ठेवण्यात आली.


ब्रिटनमधील लॅबवर अतिरिक्त ताण 


कोरोना तपासणी करणाऱ्या ब्रिटनमधील लॅबवर अतिरिक्त ताण पडत असल्याची माहिती आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी दिलीये.. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटनमध्ये रुग्णांच्या तपासणीवर  भर देण्यात येत आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत दिवसाला ५ लाख टेस्ट करण्याचं उद्धिष्ठ सरकारने ठेवले आहे. 


सरकारविरोधात आंदोलन


अर्जेंटिनातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सोमवारी सरकारविरोधात आंदोलन केले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केला. कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना मरण पावलेल्या सहकाऱ्यांचे फोटो घेऊन हे सर्वजण ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले होते.


बुडापेस्टमध्ये होणाऱ्या UEFAसूपर कप फुटबॉल सामना पाहाण्यासाठी जाऊ नये असं आवाहन बव्हेरियाचे प्रीमियर मार्क सोडर यांनी नागरिकांना केलंय. बुडापेस्ट सध्या कोरोनचा हॉटस्पॉट ठरलाय. इतकच नाही तर फुटबॉ सामन्यांसाठी UEFAनं ३ हजार तिकिटांचं वाटप केलंय. त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेत सोडर यांनी नागरिकांना आधीच सतर्क केले आहे.