लंडन : ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवत असलेली कोरोनावरील लसीची मानवी चाचणी थांबवण्यात आली आहे. तरीही या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोरोनावरील लस तयार करु असा विश्वास ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका या संस्थेने व्यक्त केला आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाचे मुख्य कार्यकारी पास्कल सोरियट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लस तयार करताना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले. त्यामुळे कोरोनावरील लस डिसेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात असणारी लस थांबविण्यात आली आहे. काहींना ही लस दिल्यानंतर त्रास झाला. म्हणून भारतातही लस देणे थांबविण्यात आले आहे.


अधूनमधून जंगलात पुन्हा आग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलिफोर्नियाच्या जंगलात महिन्याभरापासून वणवा पेटला आहे. या जंगलात लागलेल्या वणव्याची ड्रोनच्या सहाय्यानं घेतलेली दृश्य प्रशासनानं जाहीर केलीयत. ओरेगॉनच्या कास्केड पर्वतांवर हा वणवा भडकला. या वणव्यात वनसंपदेसोबतच मानवी वस्तीचंही मोठे नुकसान झाले आहे. ड्रोनने टिपलेल्या दृश्यांतून वणव्याचं तांडव स्पष्ट दिसून येतंय. यात लाखो एकर जंगल जळून खाक झाल्याचं दिसत आहे. तसेच जंगलाशेजारी असलेल्या मानवी वस्त्याही आगीत उध्वस्त झाल्यात. अजूनही अधूनमधून जंगलात पुन्हा आग लागत आहे.


बैरुतमध्ये पुन्हा भीषण आग 


महिनाभरापूर्वी स्फोटानं हादरलेल्या लेबनॉनच्या बैरुतमध्ये पुन्हा भीषण आग लागली. ज्या बैरूतच्या बंदरावर स्फोट झाला होता त्याच ठिकाणी ही आग लागली. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही अशी माहिती आज बैरुतच्या प्रशासनानं दिलीय. पण काही काळ भीतीचे वातारवण होते. लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं ही आग विझवण्यात आली. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार तेल आणि टायरच्या गोदामात ही आग लागल्याची माहिती दिली. 


झारका शहर स्फोटांनी हादरले


जॉर्डनमधील झारका शहर पहाटेच्या अंधारात स्फोटांनी हादरुन गेले. झारकात निकामी आणि वापरात नसलेल्या बॉम्ब आणि इतर सैन्याचं साहित्य ठेवण्यासाठी गोदाम आहे. त्या गोदामात शॉकसर्किटमुळे आग लागली. आणि नंतर स्फोट झाल्याचा अंदाच वर्तवण्यात येतोय. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण स्फोटाने पहाटे शहर हादरले.