Iran Israel News : इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या संघर्षात आता इराणचाही प्रवेश झाला असून, इस्रायलच्या लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार इराणनं जवळपास 100 हून अधिक बॅलेस्टीक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. हा हल्ला इतक्या भीषण स्वरुपाचा होता, की संपूर्ण इस्रायलमध्ये हाय अलर्ट लागू करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्षेपणास्त्रांचा हल्ला झाल्यानंतर देशभरात सायरन वाजण्यास सुरुवात झाली आणि नागरिकांना तताडीनं बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्यास सांगितलं. प्राथमिक स्वरुपात मिळालेल्या माहितीनुसार इस्रायमध्ये या हल्ल्यानंतर 6 नागरिकांचा मृत्यू झाला तर, अनेकजण जखमी झाले. 


इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी विशेष सूचना 


इस्रायलवर इराणकडून करण्यात आलेल्या या भीषण हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं इस्रायलमध्ये असणाऱ्या भारतीलांना अनुसरून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तिथं वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांनी सतर्कता बाळगत क्षणोक्षणी सावध राहण्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दुतावासाच्या वतीनं देण्यात आला आहे. हल्ला होणाऱ्या इस्रायलमध्ये असणाऱ्या भारतीयांनी सद्यस्थितीला सुरक्षित ठिकाणी राहून दुतावासाच्या संपर्कात राहण्याचा सूचना केल्या आहेत. 




इराणनं केलेल्या या हल्ल्यानंतर इस्रायलमधील अनेक गावं आणि शहरांचं मोठं नुकसान झालं, ज्यानंतर येथील तणावग्रस्त परिस्थितीमध्ये भर पडली. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असतानाच आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. 


जो कोणी आमच्यावर हल्ला करेल... 


इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणचा हा हल्ला म्हणजे त्यांच्याकडून झालेली एक मोठी चूक आहे असं सूचक विधान केलं. आमच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असं ते स्पष्ट म्हणाले. सदर हल्ल्यानंतर काही तासांनीच ते म्हणाले, 'इराणनं आज रात्री मोठी चूक केली आणि याची किंमत त्यांना फेडावी लागेल. आमच्यावर जो कोणी हल्ला करेल, आम्ही त्याच्यावर प्रतीहल्ला करू' अशी सूडभावना त्यांनी व्यक्त केली.