मुंबई : अमेरिका-इराण यांच्यात तणाव वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढले आहेत. याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होणं स्वाभाविक आहे. सोमवारी पेट्रोल १५ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी महाग झालं. ही दरामध्ये झालेली सलग पाचवी वाढ आहे. शिवाय आता इराकवर निर्बंध घालायची भाषाही ट्रम्प प्रशासनानं सुरू केलीये. तसं झालं तर इंधनाचे दर प्रचंड भडकू शकतील. इंधन महागलं तर सर्वच वस्तू महाग होतात. त्यामुळे तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या गुंतवणुकीवरही इराण-अमेरिका तणावाचा विपरित परिणाम होणार आहे. इराणनं अद्याप कोणतंही आततायी पाऊल उचललं नसल्यामुळे मंगळवारी अमेरिकेसह भारतातील शेअर बाजार सावरले असले तरी सोमवारची पडझड मोठी होती. एका दिवसात दलाल स्ट्रीटवर गुंतवणूकदारांचे तब्बल ३ लाख कोटी रुपये धुतले गेले होते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याचाही फटका बसणार आहे. सोन्याचे दर ऑलटाईम हाय झाले आहेत.


तिसरा फटका बसू शकतो तो अर्थव्यवस्थेच्या वाढीला... सध्या देशाची अर्थव्यवस्था प्रचंड डालमडोल आहे. विकासदरानं गेल्या ६ वर्षांमधला निचांक गाठलाय. कच्च्या तेलाच्या दरात १० डॉलरची वाढ झाली तर भारताच्या महिन्याच्या बिलात तब्बल दीड अब्ज डॉलर्सची वाढ होते. सध्याच्या नाजूक परिस्थितीमध्ये हा भार आपल्या अर्थव्यवस्थेला परवडणारा नाही. आखातामध्ये तणाव वाढला तर विकासदर आणखी मंदावण्याचा धोका आहे. 


आणखी एक चिंतेची बाब म्हणजे देशाची सुरक्षा... इराणसोबत तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानमधील लष्करी प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतलाय. पाकिस्तान दहशतवाद रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचा ठपका ठेवत अमेरिकेनं २०१८मध्ये हे प्रशिक्षण बंद केलं होतं. मात्र आता इराणविरोधात कारवाईसाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासन पुन्हा एकदा पाकिस्तानचं लांगुलचालन सुरू करण्याची शक्यता आहे. असं झालं तर आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ती गंभीर बाब ठरेल.