Israel Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने शुक्रवारी गाझा पट्टीवर न भूतो न भविष्यती असा हल्ला करणार असल्याचा इशारा दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी हमासचा खात्मा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा प्रण घेतल्यानंतर आता इस्रायल मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असं असतानाच इस्रायलनेही यासंदर्भातील स्पष्ट संकेत देताना गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांना विस्थापित व्हावे असा इशारा दिला आहे. गाझा पट्टीवर हल्ला करण्याआधी नागरिकांनी हा भाग खाली करावा असं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे.


10 लाख पॅलेस्टिनी नागरिकांना इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रायलच्या सुरक्षा दलाने उत्तरेकडील गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना आणीबाणीचा इशारा दिला आहे. येथील 10 लाख पॅलेस्टिनी नागरिकांना इस्रायलने पुढील 24 तासांमध्ये गाझा पट्टी खाली करण्यास सांगितलं आहे. आम्ही या ठिकाणी मोठा हल्ला करणार असून तातडीने हा प्रदेश खाली करावा असं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रांनाही यासंदर्भातील माहिती इस्रायलकडून देण्यात आली आहे.


24 तासांत जागा खाली करा


शुक्रवारी मध्यरात्री इस्रायलने संयुक्त राष्ट्रांना दिलेल्या माहितीमध्ये वाडी गाझा पट्ट्याच्या उत्तरेला राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांनी 24 तासांमध्ये दक्षिण गाझामध्ये स्थलांतरित व्हावं असं यात म्हटलं आहे. यासंदर्भातील इशारा इस्रायलने दिल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यांनीच दिली आहे.


7 तारखेपासून सुरु आहे संघर्ष


मागील 6 दिवसांपासून या भागावर इस्रायल हवाई हल्ले करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून दिलेल्या इशाऱ्याचा असाही अर्थ काढला जात आहे की आज म्हणजेच शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी जमीनीवरुन गाझा पट्टीवर हल्ला करणार आहे. हमास या पॅसेल्टीनी दहशतवादी संघटनेनं शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये घुसखोरी करुन अनेक गावांमध्ये नरसंहार केल्यानंतर इस्रायल पॅलेस्टाइन युद्धाला नव्याने तोंड फुटलं आहे. वाडी गाझा या प्रदेशामध्ये 11 लाख पॅसेल्टीनी नागरिक वास्तव्यास आहेत. 


भारताने स्पष्ट केली भूमिका


हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला हा 'दहशतवादी कृत्य'च असल्याचं मानतो, असं भारताने म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा कायम राहणार असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केलं आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोघांनी शांततेमध्ये नांदावं यासाठी चर्चेच्या माध्यमातूनच यावर तोडगा शोधला पाहिजे अशी भारताचा भूमिका असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागहची यांनी म्हटलं आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारत खंबीरपणे इस्रायलच्या पाठीशी उभा असल्याचं स्पष्ट केलं होतं.