Israel-Palestine Conflict: जमिनीच्या एका तुकड्यासाठी तीन धर्म आमने-सामने; इस्रायल- पॅलेस्टाईन का धुमसतंय?
Israel-Palestine Conflict Explained: जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींमध्ये एकिकडे रशिया आणि युक्रेनमधील मतभेद चिघळत असतानाच आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही राष्ट्रांमधील वादही चव्हाट्यावर आला आहे.
Israel-Palestine Conflict Explained: अतिशय विकोपास पोहोचलेला इस्रायल आणि हमास यांच्यातील वाद आता हिंसक वळणावर पोहोचला आहे. शनिवारी समोर आलेल्या वृत्तानुसार हमासनं गाझा पट्टीवरून इस्रायलवर 5000 रॉकेट हल्ले केल्याचा दावा केला. या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची अधिकृत बाब समोर आली आहे. तिथं इस्रायलनंही हमासला इशारा देत युद्धाचा उल्लेख केला आहे, ज्यामुळं इथं एक हिंसक संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना हमासनं इस्रायलला निशाण्यावर घेतलं असतानाच गाझा पट्टीनजीक संघर्ष वाढताना दिसत आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटनांमधील हा संघर्ष पहिल्यांदाच झाला नसून 2021 मध्येही अशीच ठिणगी पडली होती.
या प्रांतातील भौगोलिक रचना समजून घेताना...
मध्यपूर्वेला असणारा इस्रायल हा एक यहूदी देश आहे. या देशाच्या पूर्वेला वेस्ट बँक असून, तिथं 'पॅलेस्टाईन नॅशनल ऑथोरिटी'कडून पॅलेस्टिनी नागरिकांसाठी सरकारी कामकाज चालवलं जात असून, या साऱ्याला संयुक्त राष्ट्रांकडूनही मान्यता मिळाली आहे. इस्रायलच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये एक पट्टीवजा भाग आहे जो दोन बाजूंनी इस्रायलकडून वेढलेला असून, तिच्या एका बाजूला भूमध्य समुद्र आहे, दुसऱ्या एका बाजूला इजिप्तची भूमी आहे. हाच भाग गाझा पट्टी म्हणून ओळखला जातो.
गाझा पट्टीच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या सत्ता पाहायला मिळतात. इस्रायलमध्ये इस्रायली सरकार आहे, वेस्ट बँकमध्ये फाताह पार्टीचं वर्चस्व आहे. तर, गाझा पट्टीवर हमासचा ताबा आहे. पण, गाझा पट्टीच्या दुसऱ्या भागावर मात्र सरकारचं नियंत्रण नाही. 2007 पासून सत्तांतर होईपर्यंत इथं हमासचीच सत्ता पाहायला मिळाली होती. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे यहूदी, इस्लाम आणि ख्रिस्तधर्मीयांसाठी महत्त्वपूर्ण असणारं जेरुसलेमही आहे.
जगाला विचार करायला लावणारा वाद समजून घेताना....
1920 ते 1940 दरम्यान, युरोपात यहुदींवर प्रचंड अत्याचार करण्यात आले. ज्यानंतर हा संपूर्ण समाज हक्काच्या देशाच्या शोधात इथं पोहोचला ज्या देशाला त्यांनी मातृभूमी म्हणून संबोधलं. यादरम्यानच यहुदी आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये प्रचंड हिंसा पेटली. परिणामी 1947 मध्ये संयुक्त राष्ट्रांकडून यहुदी आणि अरबांसाठी वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी मतदानाचं आवाहन करण्यात आलं. यादरम्यानच जेरुसलेम एक आंतरराष्ट्रीय शहर असेल हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांनी प्रकाशात आणला.
यहुदींनी ही बाब स्वीकारली, पण अरबांनी मात्र या साऱ्याचा विरोध केला. तिथं ब्रिटनमध्येही या वादावर तोडगा निघाला नाही. ज्यामुळं पुन्हा एकदा 1948 मध्ये यहुदी नेत्यांनी इस्रायलच्या निर्मितीची घोषणा केली. पॅलेस्टिनींकडून याचा विरोध झाला आणि अशा रितीनं दोन्ही गटांमध्ये पहिल्या युद्धाची ठिणगी पडली. युद्ध सुरु होऊन युद्धविरामाची ठिणगी पडेपर्यंत इस्रायलच्या वाट्याला मोठा भाग गेला होता.
पॅलेस्टिनी नागरिकांसाठी जॉर्डन आणि इजिप्तसारख्या राष्ट्रांनी लढा दिला पण, त्यांच्या वाट्याला आलेल्या पराभवामुळं पॅलेस्टाईनचा विस्तारच होई शकला नाही. तिथं जॉर्डनच्या वाट्याला जो भूभाग गेला त्याला वेस्ट बँक असं नाव देण्यात आलं तर इजिप्तमधील भागाला गाझा पट्टी असं नाव मिळालं. तर जेरुसलेम शहराचा पूर्वेकडील भाग जॉर्डनच्या संरक्षण दलांकडे आणि पश्चिमेकडील भाग इस्रायली संरक्षण दलांकडे विभागून देण्यात आला. या साऱ्यामध्ये कुठेत शांततेचा करार झाला नाही. 1967 मध्ये जेव्हा दुसऱ्यांदा युद्धाची ठिणगी पडली तेव्हा इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग आणि गाझा पट्टीवर ताबा मिळवला.
हेसुद्धा वाचा : जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल
इस्रायल गाझामधून मागे हटलं पण, वेस्ट बँकवर मात्र त्यांनी ताबा कायम ठेवला. ज्यानंतर पूर्व जेरुसलमेमला आपली राजधानी मानण्याता अट्टहास इस्रायलनं सुरु ठेवला तर पॅलेस्टिनी नागरिक या भागाला आपल्या भविष्यातील राजधानी मानतात.
हे शहर यहूदी, ख्रिस्तधर्मीय आणि इस्लाम धर्मीयांसाठी अतीव महत्त्वपूर्ण आहे. इथं इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्वं असणारं अल अक्सा मस्जिद आहे. तर, यहुदींसाठी महत्त्वाचं असणारं टेंपल माउंटही इथं आहे. ख्रिस्तधर्मीयांसाठी महत्त्लाचं असणारं चर्च ऑफ द होली स्पेलकरही इथंच आहे. येशू ख्रिस्तांचा जन्म, त्यांचा जीवन प्रवास, त्यांचा देहत्याह आणि पुनर्जन्म या सर्व गोष्टींचं केंद्र म्हणून या शहराकडे पाहिलं जातं. ज्यामुळं आजही तीन धर्म या जागेसाठी संघर्ष करताना दिसतात.