2 भारतीय तरुणी करणार हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा! इस्रायली लष्कराकडून लढणार
Israel Palestine Hamas War Indian Women: इस्रायलमध्ये मागील आठवड्याभरापासून युद्धजन्य परिस्थिती आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलमध्ये घुसखोरी केल्याने हा संघर्ष सुरु झाला आहे.
Israel Palestine Hamas War Indian Women: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हमासमध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमास संघटनेनं इस्रायलमध्ये घुसखोरी करुन मोठ्या प्रमाणात नरसंहार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर क्षेपणास्रांनी मारा केला जात आहे. इस्रायलमधील आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार इस्रायलमधील 1200 हून अधिक अधिक लोकांची हमासच्या दहशतवाद्यांनी हत्या केल्याचं सांगितलं आहे. या युद्धासंदर्भातील नवीन माहिती समोर येत आहे. अशीच एक बातमी समोर आली असून ही बातमी या युद्धग्रस्त देशात इस्रायलकडून लढणाऱ्या 2 भारतीय तरुणींबद्दलची आहे.
कोण आहेत या 2 मुली?
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिल्ल्या वृत्तानुसार इस्रायलकडून लढणाऱ्या 2 भारतीय तरुणींची नावं रिया आणि निशा अशी आहेत. निशा ही दूरसंचार आणि सायबर सुरक्षा विभागात कार्यरत असून ती फ्रंटलाइन युनिटची प्रमुख आहे. सध्या निशा ही युद्धात कम्युनिकेशनसंदर्भातील महत्त्वाची तांत्रिक जबाबदारी पार पाडत असल्याचं समजतं. तर दुसरीकडे रिया सध्या जगातील सर्वात शक्तीशाली लष्करापैकी एक असलेल्या इस्रायली लष्करात कायम स्वरुपी संधी मिळावी म्हणून कमांडो ट्रेनिंग घेत आहे. निशा आणि रिया दोघीही मूळच्या गुजरातच्या आहेत. या दोघीही रिझर्व्ह आर्मीचा भाग आहेत.
अनेक वर्षांपासून इस्रायलमध्ये वास्तव्य
इस्रायलच्या लष्करात असलेल्या या दोघींचे वडील गुजरातमधील जुनागढमधील मनावदार तालुक्यातील कोठाडी गावचे रहिवाशी आहेत. रियाच्या वडिलांचं नाव जीवाभाई मुलियाया असं असून निशाच्या वडिलांचं नाव सवदासभाई मुलियाया आहे. मागील अनेक वर्षांपासून या दोघांचे कुटुंबीय इस्रायलमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी इस्रायलचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. मुलियाया हे मागील अनेक वर्षांपासून इस्रायलमध्येच नोकरी करतात. तर जीवाभाई हे इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीवमधील एका किराणा मालाच्या दुकानाचे मालक आहेत.
मुलीबद्दल वडील काय म्हणाले?
आपल्या मुलीबद्दल बोलताना जीवाभाई मुलियासिया यांनी, "माझ्या मुलीने मागील 2 वर्षांपासून लेबनान, सीरिया, जॉर्डन आणि इजिप्तच्या सीमेवर लष्करी सेवा दिली आहे. ती गश डेनमध्ये तैनात होती. ही तीच जागा आहे जिथून इस्रायलच्या लष्कराने 2021 मध्ये गाझामधील हमासवर हल्ला केला होता," असं सांगितलं.
गुजरातचे मुख्यमंत्री घरी गेले होते
सध्या सुरु असलेल्या हमासविरुद्धच्या युद्धात या दोघीही अद्याप सक्रीयपणे सहभागी झालेल्या नाहीत. इस्रायलमध्ये मोठ्या संख्येनं गुजरातील कुटुंब वास्तव्यास आहेत. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि त्यांची पत्नी अंजलिबेन यांनी आपल्या इस्रायलच्या दौऱ्यामध्ये तेल अवीवमध्ये जीवाभाईंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
नक्की पाहा >> हॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवतील इस्रायलच्या महिला सैनिक!; हे फोटो पाहून थक्क व्हाल
लष्करी सेवा बंधनकारक
इस्रायलमध्ये लष्करी प्रशिक्षण बंधनकारक आहे. 18 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लष्करी प्रशिक्षण घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. इस्रायलमध्ये आजही पुरुषांना 32 महिन्यांची लष्करी सेवा बंधनकारक असून महिलांसाठी ही कालमर्यादा 24 महिने म्हणजेच 2 वर्ष इतकी आहे. या प्रशिक्षणानंतर इस्रायलमधील सर्वांना पुढील 10 वर्षांसाठी राखीव सैन्य म्हणून ग्राह्य धरलं जातं. यामध्ये महिलांचाही समावेश असतो. गरज असेल तेव्हा या सर्वांना प्रत्यक्ष युद्धात सहभागी व्हावं लागतं. सध्या अशाच अनेक तरुणी युद्धात सहभागी झाल्या आहेत. तरुण महिलांना लष्करी सेवा बंधनकारक असली तरी विवाहित महिलांना, अपत्य असलेल्या महिलांना आणि धार्मिक सेवा देणाऱ्या पुरुषांना लष्करी सेवेचं बंधन नाही.