मुस्लिमविरोधी पोस्ट टाकली म्हणून फेसबुकने काय केले पाहा...
रविवारी यायर नेतान्याहू यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली होती.
मुंबई - मुस्लिमविरोधी फेसबुक पोस्ट टाकली म्हणून फेसबुकने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा मुलगा यायर याचे फेसबुक अकाऊंट तात्पुरते ब्लॉक केले. काही इंग्रजी माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. 'द टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार फेसबुकने यायर यांचे अकाऊंट २४ तासांसाठी ब्लॉक केले आहे.
रविवारी यायर नेतान्याहू यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली होती. गेल्या आठवड्यात इस्रायलच्या सीमेवर झालेल्या धुमश्चक्रीत 'इस्रायल डिफेन्स फोर्स'चे दोन सैनिक मारले गेले होते. त्यापार्श्वभूमीवर "avenging the deaths" अशी एक पोस्ट त्यांनी प्रसिद्ध केली. यानंतर त्यांचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. 'अविश्वसनीय... केवळ टीका केली म्हणून फेसबुकने माझे अकाऊंट २४ तासांसाठी ब्लॉक केले आहे. विचार मांडण्यास रोखणारे पोलीस.', अशा आशयाचे ट्विट यायर यांनी लगेचच ट्विटरवर केले. या संदर्भात फेसबुकने अजून अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
आपली मते मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ठिकाणीच आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही त्यांनी म्हटले आहे. अकाऊंट ब्लॉक केल्यावर यायर यांची संबंधित फेसबुक पोस्टही काढून टाकण्यात आली. त्यानंतर यायर यांनी आपल्या मूळ पोस्टचा स्क्रिन शॉट आणि फेसबुकवर टीका करणारी पोस्ट लगेचच दुसऱ्या ठिकाणी प्रसिद्ध केली.
तुम्हाला माहितीये जगात कोणत्या देशात दहशतवादी हल्ले होत नाहीत? आईसलॅंड आणि जपानमध्ये. योगायोगाने तिथे अजिबात मुस्लिम समाज नाही, अशीही पोस्ट यायर यांनी प्रसिद्ध केली आहे.