हमास या अतिरेकी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. हमास या संघटनेचा तळ असणाऱ्या गाझा पट्टीला संपूर्ण वेढा देण्यासह तेथील वीज, अन्न, इंधन पुरवठा तोडण्याचे आदेश इस्त्रालयच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान युद्धाची किंमत दोन्ही बाजूंना मोजावी लागत असून हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. दुसरीकडे इस्त्रायलमध्ये आता सैनिकांसह काही नागरिकही युद्धात उतरले असून सैन्यांना मदत करत आहेत. यादरम्यान इस्त्रायलची वेब सीरिज 'फौदा'मधील अभिनेता लियोर रजसंबंधी मोठी महिती समोर आली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले होत असताना लियोर रज लोकांच्या मदतीसाठी मैदानात उतरला आहे. ज्या क्षेत्रात बॉम्हहल्ले होत आहेत तेथील नागरिकांना वाचवण्यासाठी, लियोर रजने स्वयंसेवकांची टीममध्ये सहभाग घेतला आहे. 'Brothers in Arms' असं या स्वयंसेवी संघटनेचं नाव असून, हमासविरोधात फ्रंट लाइनवर काम करत आहे. एका व्हिडीओवरुन याला दुजोरा मिळाला आहे. या व्हिडीओत त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत असून, लोकांना मात्र घाबरु नका असं आवाहन करताना दिसत आहे. 


लियोर रज हा 'फौदा' या वेब सीरिजमुळे प्रसिद्ध आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध असून, टॉप वेब सीरिजपैकी एक आहे. लियोर रज याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये इस्त्रायलमध्ये नेमकी काय स्थिती आहे याचा अंदाज येत आहे. व्हिडीओत त्याच्यासोबत इस्रायल डेमोक्रसी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष योहानन प्लेसनर आणि पत्रकार अवी यिसास्चारोव्ह दिसत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Lior Raz (@liorraz)


"मी, योहानन प्लेसनर आणि अवी यिसास्चारोव्ह दक्षिणेच्या बाजूला गेलो असून त्या भागात राहणाऱ्या लोकांना मदत करणारे शेकडो धाडसी 'ब्रदर्स इन आर्म्स'च्या स्वयंसेवकांमध्ये सामील झालो आहोत. या स्वयंसेवकांना वेगवेगळी कामं देण्यात आली आहे. आम्हाला बॉम्बहल्ला होणाऱ्या बुलेवार्ड येथील दोन कुटुंबीयांना वाचवण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. तुम्ही अजिबात घाबरु नका," असं त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.


व्हिडीओत लियोर रज हा योहानन प्लेसनर यांच्यासह सुरक्षेसाठी एका भिंतीमागे लपल्याचं दिसत आहे. यावेळी त्यांनी व्हिडीओतून आकाशातून जाणारे रॉकेट्स दाखवले आहेत. 


दरम्यान या हिंसाचारात आतापर्यंत 1600 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे, हमासने शनिवार व रविवारी केलेल्या विनाशकारी हल्ल्यानंतर अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच हे युद्ध थांबवण्याचा आणि नागरिकांचे संरक्षण करण्याचं आवाहन केलं आहे.