इस्त्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत सुरु असलेलं युद्ध अद्यापही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. या हल्ल्यात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. हमासने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 1300 इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 220 हून अधिक इस्त्रायली सैनिकांचा समावेश आहे. नामा बोनी ही 77 व्या बटालियनची सैनिक होती. शनिवारी हमासने हल्ला केला तेव्हा नामा बोनी कर्तव्यावर होती. यावेळी हमासने केलेल्या गोळीबारात नामा बोनीचा मृत्यू झाला. दरम्यान,  गोळीबार सुरु असताना नामा बोनीने लपण्यासाठी एक जागा शोधली होती. जिथून तिने आपल्या कुटुंबाला एक संदेश पाठवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्त्रायलमधील प्रसारमाध्यम Ynet ने दिलेल्या वृत्तानुसार, नामा बोनीने आपल्या कुटुंबाला एक मेसेज पाठवला होता. यात तिने लिहिलं होतं की, "मला तुमच्या सर्वांची चिंता आहे. माझ्या डोक्याला जखम झाली असून, दहशतवादी माझ्यावर गोळ्या झाडण्याची शक्यता आहे". तिने मेसेजमध्ये आपल्यासह आणखी एक सैनिक असून, कोणी आमच्या बचावासाठी पोहोचू शकलं नसल्याचंही सांगितलं आहे. 


"येथे काही दहशतवादी पोहोचले आहेत. ते येथून जाणार नाहीत. मला कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज येत आहे. बहुतेक एखाद्याला ठार केलं जात आहे," असं तिने दुसऱ्या एका मेसेजमध्ये लिहिलं होतं.


Ynet ने नामा बोनीची नातेवाईक इलूकशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, "जेव्हा हल्ला झाला तेव्हा नामा बोनी मिलिट्री स्टेशनच्या गेटवर तैनात होती. सकाळी 7.30 वाजल्यापासून ती आम्हाला मेसेज पाठवत होती. पण त्यानंतर तिने कोणताही मेसेज पाठवला नाही".


नामा बोनीचे कुटुंबीय जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तिला रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती त्यांना मिळाली. पण यावेळी त्यांना कोणीही तिच्या प्रकृतीबद्दल माहिती देत नव्हतं असं इलूक यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, "ती अद्यापही जिवंत आहे यावर आम्ही विश्वास ठेवू इच्छित आहोत. पण जेव्हा तिच्या आई-वडिलांकडे नोटिफिकेशन आलं तेव्हा तिचं नाव आता आकड्यांमध्ये सामील झाल्याचं आम्ही समजून गेलो".