China On Chandrayaan-3 Successful Landing: चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा 23 ऑगस्ट 2023 रोजी समावेश झाला. भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतील 'विक्रम' लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि भारतीय अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोमधील वैज्ञानिकांबरोबर सर्व भारतीयांनी एकच जल्लोष केला. या यशानंतर जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेक देशांमधील वृत्तपत्रांमध्ये भारताच्या या ऐतिहासिक यशाची बातम्या पहिल्या पानावर छापण्यात आल्या आहेत. मात्र चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'मध्ये भारताच्या या यशावरुन खोचक पद्धतीने विधान करण्यात आली आहे. चीनच्या मोहिमेशी भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेची तुलना या वृत्तपत्राने करताना चीन कसा भारतापेक्षा याबाबतीत सरस आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. 


चीन अधिक सरस असल्याचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ग्लोबल टाइम्स'ने भारताबरोबर चिनी तंत्रज्ञानाची तुलना करताना चीन अनेक बाबतींमध्ये भारतापेक्षा फार पुढारलेला असल्याचा दावा केला आहे. बीजिंगमधील वरिष्ठ अंतराळ तज्ज्ञ पँग झिहाओ यांच्या हवाल्याने या वृत्तपत्रामध्ये, "2010 मध्ये चांग ई-2 लॉन्च केल्यापासून ऑर्बिटर आणि लँडर थेट पृथ्वी-चंद्राच्या ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये पाठवण्यास चीन सक्षम आहे. भारताकडे हे तंत्रज्ञान नाही कारण त्यांच्या लॉन्च व्हेइकल्सची क्षमता मर्यादित आहे. चीनमधील तंत्रज्ञान अधिक आधुनिक आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होते. चीन जे इंधन वापरतं हे सुद्धा फार आधुनिक आहे," असा दावा केला आहे.


विक्रम लँडर टीकणार नसल्याचा दावा


या चिनी वृत्तपत्राने भारताला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. या तज्ज्ञाच्या हवाल्याने वृत्तपत्राने, "चीनचं रोव्हर आकाराने फार मोठं आहे. ज्याचं वजन 140 किलोग्राम आहे. भारताच्या रोव्हर प्रज्ञानचं वजन 26 किलोग्रामच आहे. भारताचं प्रज्ञान चंद्रावरील रात्रीच्या कालावधीमध्ये टिकू शकणार नाही. याचा कार्यकाळ चंद्रावरील एका दिवसाएवढाच (चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीवरील 14 दिसवसांइतका असतो) आहे. या उलट चीनच्या यूटू-2 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वाधिक कालावधीसाठी सक्रीय राहत काम करण्याचा विक्रम केला आहे. यामागील कारण म्हणजे यूटू-2 मध्ये औष्णिक ऊर्जेवर काम करत असल्याने ते दिर्घकाळ काम करतोय," असंही म्हटलं आहे.


भारतावर आरोप


भारत आणि चीनने 'ब्रिक्स' तसेच 'एसससीओ तंत्रज्ञाना'अंतर्गत अंतराळ क्षेत्रात एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असंही 'ग्लोबल टाइम्स'ने म्हटलं आहे. चिनी वृत्तपत्राने आपल्या लेखाच्या शेवटी, जो देश चीनबरोबर अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छूक आहे त्यांच्यासाठी चीन तयार आहे. मात्र भारत अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमामध्ये सहयोग करण्याची वेळ आली की सीमावाद आणि राजकीय मतभेद मध्ये आणतो असा बिनबुडाचा आरोपही चीनने केला आहे. भारत एकत्र काम करण्यासाठी सहकार्य करत नसल्याचा चीनचा आरोप बिनबुडाचा आहे कारण दोन्ही देशांमध्ये कधी या विषयावर चर्चाच झालेली नाही. या लेखामधून चांद्रयान-3 चं यश पाहून चीनचा जळफळाट झाल्याचं दिसून येत आहे.