Driving Licence च्या परीक्षेत 959 वेळा नापास! Exam Fee म्हणून 11 लाख खर्च केल्यानंतर 960 व्या प्रयत्नात मिळालं Licence
960 Attempts For Driving Licence: या महिलेला अखेर लायसन्स मिळालं तेव्हा ती 69 वर्षांची होती. तिने या परीक्षांसाठी अर्जाची फी म्हणून तब्बल 11 लाख 15 हजार 273 रुपये खर्च केले. ती परीक्षा पास झाल्यानंतर तिच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्येही मोठं सेलिब्रेशन झालं.
960 Attempts For Driving Licence: ड्रायव्हिंग आणि ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) या दोन्ही गोष्टी कायमच चर्चेचा विषय असतो. त्यातही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी केलेले जुगाड आणि किस्सेही अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. असाच एक किस्सा सध्या जगभरामध्ये चर्चेत आहे तो म्हणजे 960 व्या प्रयत्नात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलेल्या महिलेचा. खरं तर ही बातमी तशी जुनी असली तरी सध्या ती कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे अशा प्रेरणादायी मेसेजसहीत फिरताना दिसत आहे.
नेमकं घडलं काय?
हा संपूर्ण प्रकार नेमका 18 वर्षांपूर्वी घडला होता. मात्र रेडिएट या सोशल मीडिया साईटवरुन ही गोष्ट पुन्हा व्हायरल झाली आहे. अनेकांनी या महिलेकडून एखाद्या गोष्टीच्या मागे जिद्दीने लागल्यास आपण ती मिळवू शकतो अशी प्रेरणा घेण्याची शिकवण मिळते असं म्हटलं आहे. हा सारा प्रकार 2005 साली दक्षिण कोरियामधील चा सा-सून नावाच्या महिलेबरोबर घडला होता, असं वृत्त 'न्यू यॉर्क पोस्ट'ने दिलं होतं. शेकडो वेळा प्रयत्न केल्यानंतरही अथक प्रयत्नानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणाऱ्या या महिलेवर त्यावेळेसही कौतुकाचा वर्षाव झाला होता.
रोज द्यायची परीक्षा
चा सा-सून नावाच्या या महिलेने सर्वात आधी 2005 साली ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लेखी परीक्षा दिली होती. पहिल्या प्रयत्नात ती अपयशी ठरल्यानंतर पुढील 3 वर्ष आठवड्यातील 5 दिवस ती रोज परीक्षा देत होती. तरीही तिला यश आलं नाही. तर ती आठवड्यातून दोनदा परीक्षा देऊ लागली. जवळजवळ 860 वेळा लेखी परीक्षा दिल्यानंतर या महिलेला लेखी परीक्षेत यश आलं. मात्र यानंतरची खरी परीक्षा पुढे होती ती म्हणजे प्रॅक्टीकल. प्रत्यक्षात गाडी चालवून दाखवण्याची परीक्षा कठीण मानली जाते.
11 लाख 15 हजार 273 रुपये खर्च
गाडी चालवून दाखवण्याच्या परीक्षेमध्ये चा सा-सून यांना अनेकदा वेळा अपयश आलं. त्यामुळे त्यांच्या ड्रायव्हिंग टेस्टच्या प्रयत्नांची संख्या तब्बल 960 पर्यंत पोहोचली. शेवटी 2010 मध्ये चा सा-सून यांना लायसन्स मिळालं. मात्र तेव्हा चा सा-सून यांचं वय 69 वर्ष इतकं होतं. या परीक्षांसाठी चा सा-सून यांनी 11 हजार पाऊंड म्हणजेच 11 लाख 15 हजार 273 रुपये खर्च केले.
...अन् नवीन कार भेट मिळाली
चा सा-सून यांच्या या प्रवासामध्ये त्यांना सोबत करणारे त्यांचे ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षक पार्क सु-योन यांनी 2010 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत यासंदर्भात माहिती दिली. "जेव्हा त्यांना लायसन्स मिळालं तेव्हा सर्वांनाच प्रचंड आनंद झाला. आम्ही आनंदाने एकमेकांना मिठी मारली. पुष्पगुच्छ देऊन आम्ही तिचं अभिनंदन केलं. आमच्या पाठीवरील थोडा भार हलका झाला असं आम्हाला वाटलं. तिने फार हिंमत दाखवली," असं पार्क सु-योन म्हणाले. हा प्रवास खडतर झाला तरी ही बातमी समोर आल्यानंतर चा सा-सून या दक्षिण कोरियामध्ये सेलिब्रिटी झाल्या. याच देशातील जगप्रसिद्ध कारनिर्माता कंपनी असलेल्या ह्युंडाईने चा सा-सून यांना नवीन कार भेट दिली.
सोशल मीडियावर वाद
सध्या सोशल मीडियावर चा सा-सून या लायसन्स देणं योग्य आहे की नाही यावरुन दोन गट पडल्याचं दिसत आहे. एकाने ही महिला प्रेरणास्थान असल्याचं म्हटलंय. तर अन्य एकाने एका मर्यादेहून अधिक वेळा अपयशी ठरल्यावर संबंधित व्यक्तीला कधीच लायसन्स दिलं जाऊ नये असं म्हटलं आहे. यावरुन मतमतांतरे असली तरी चा सा-सून यांनी दाखवलेली जिद्द ही कौतुकाचा विषय ठरत आहे.