एका इटालियन व्यक्तीला एकाच वेळी तीन गंभीर आजारांची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याचे समोर आला आहे. 36 वर्षीय तरुण एकाच वेळी मंकीपॉक्स (monkeypox), कोरोना (Covid) आणि एचआयव्ही (HIV) सारख्या घातक आजारांचा बळी ठरला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी सांगितले की, अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. तरुणाच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर पुरळ आणि मुरुम आढळून आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा तरुण स्पेनमधून परतला होता. 9 दिवसांनंतर, त्याला थकवा, ताप आणि घसा खवखवणे यासह अनेक लक्षणे दिसून आली. या तरुणाने 16 ते 20 जूनपर्यंत पाच दिवस स्पेनमध्ये घालवले होते. यादरम्यान त्याने पुरुषांसोबत असुरक्षित सेक्स केल्याची कबुली दिली.


जर्नल ऑफ इन्फेक्शनमध्ये प्रकाशित झालेल्या केस स्टडीनुसार, तरुणाचा कोविडचा रिपोर्ट 2 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्याच दिवशी दुपारी त्याच्या डाव्या हातावर पुरळ उठू लागले. दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीराच्या इतर भागावार आणि चेहऱ्यावर पुरळ उठली.


एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी या तीन आजारांची लागण झाल्याचे आढळून आल्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. वृत्तानुसार, संक्रमित व्यक्तीच्या शरीराच्या इतर भागांसह, गुद्द्वारात जखमा दिसू लागल्या. त्यानंतर चाचणी केलेल्या अहवालात मंकीपॉक्स आणि एचआयव्ही झाल्याचे समोर आलं.


जीनोम सिक्वेसिंगनुसार त्याला लसीचे दोन्ही डोस देण्यात आले असले तरीही त्याला ओमिक्रॉनच्या BA.5.1 प्रकाराची लागण झाली.


दरम्यान, कोरोना आणि मंकीपॉक्समधून बरे झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता एचआयव्ही संसर्गावर उपचार करणे बाकी आहे.