Trending News : जिथे सर्वसामान्यांची कल्पना संपते. तिथे जपानी तंत्रज्ञांचं संशोधन सुरू होतं. आता चक्क चंद्र आणि मंगळावर बुलेट ट्रेन नेण्याची मोहीम जपाननं हाती घेतलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानची 'स्पेस एक्स्प्रेस'
या बुलेट ट्रेनचं नाव 'स्पेस एक्स्प्रेस' असं ठेवण्यात आलंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानावर आधारित रेडियल सेंट्रल अॅक्सिस असेल. या व्हर्च्युअल रुळांवरून ट्रेन चंद्र आणि मंगळापर्यंत प्रवास करेल. 6 डब्यांच्या या गाडीमध्ये सुरूवातीला आणि शेवटी रॉकेट बुस्टर बसवलेले असतील. गाडी पुढे आणि मागे नेण्यासाठी त्याचा वापर केला जाईल.  पृथ्वीवरून चंद्र आणि मंगळाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून ही ट्रेन प्रवास करेल.  विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये 1 G, म्हणजे पृथ्वीइतकं गुरूत्वाकर्षण कायम राखलं जाईल. 


या प्रकल्पासाठी क्योटो विद्यापीठ आणि काजिमा कंस्ट्रक्शन कंपनीनं काम सुरू केलंय. पण केवळ चंद्र आणि मंगळावर जाऊन परत यायचं नाहीये बरं. तिथे राहायचीही तयारी जपाननं सुरू केलीये. त्यासाठी पृथ्वीसारखंच वातावरण असलेल्या वसाहतीही उभारल्या जाणार आहेत. 


चंद्र आणि मंगळावार वसाहत उभारणार
चंद्र आणि मंगळाच्या पृष्ठभागावर जाड काचेच्या आत या वसाहती असतील. चंद्रावरील वसाहतीला लूनाग्लास आणि मंगळावरील वस्तीला मार्सग्लास असं नाव देण्यात येणार आहे. या वसाहतींमध्ये पृथ्वीसारखंच वातावरण, कृत्रिम गुरूत्वाकर्षण असेल. आतमध्ये हिरवी झाडं, नद्या, तलाव इत्यादी सगळं काही असेल. कॉलनीमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही देण्यात येईल. 


साधारण 2050नंतर या प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरू होणार असलं, तरी चंद्र आणि मंगळावर प्रत्यक्षात जाऊन राहायला आणखी 100 वर्षं लागू शकतात. भारतात अद्याप पहिली बुलेट ट्रेन सुरूच झालेली नाही. मुंबई-अहमदाबाद मार्गावर जपानच्याच मदतीनं प्रकल्प सुरू असला तरी त्याचं काम रडत-खडतच होतंय. असं असताना जपानी मात्र 'काय तो चंद्र... काय तो मंगळ... काय ती बुलेट, ओक्केमध्ये आहे' असं म्हणतायत.