टोकिओ : डोरेमॉन हे कार्टून कॅरेक्टर बच्चेकंपनीत लोकप्रिय आहे. याच डोरेमॉनच्या थीमवर जपानची राजधानी टोकिओत स्टोअर उघडण्यात आलंय. या स्टोअरमध्ये डोरेमॉन संदर्भातली प्रत्येक गोष्ट पाहायला मिळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोरेमॉन हे कार्टून कॅरेक्टर तसं आहे जपानी डोक्यातली कल्पना. पण डोरेमॉन भारतात तुफान लोकप्रिय आहे. लहान मुलांमध्ये डोरेमॉनची क्रेझ आहे. १९६९ साली जपानमध्ये निर्मिती झालेल्या डोरेमॉन आपल्या वयाची पन्नाशी पूर्ण करतोय. या निमित्तानं जपानची राजधानी टोकिओत डोरेमॉन थीम स्टोअर सुरू करण्यात आलंय.


या स्टोअरमध्ये सबकुछ डोरेमॉन आहे. या स्टोअरमध्ये डोरेमॉनचे मग आहेत, पिलो आहेत, टी-शर्ट आहेत. रुमालही आहेत. डोरेमॉनशी संबंधित अनेक वस्तू या स्टोअरमध्ये पाहायला मिळतात. डोरेमॉन पन्नाशीत पाऊल ठेवतोय या निमित्तानं त्याच्या चाहत्यांना सेलिब्रेशन करता यावं, यासाठी हे स्टोअर उघडण्यात आलंय.


लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. तुम्हाला डोरेमॉनच्या रुमालावर स्वतःचं नाव लिहून मिळू शकतं. तुम्हाला डोरेमॉनसोबत सेल्फी काढता येतो. डोरेमॉनचं भलंमोठ्ठं घड्याळ इथं लावण्यात आलंय. हे घड्याळही चाहत्यांचा सेल्फी पॉईंट झालंय.


जगातल्या डोरेमॉनच्या सगळ्या चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी हे थिम स्टोअर उभारण्यात आलंय. डोरेमॉनला जगातल्या प्रत्येक देशात पोहचवण्यासाठी हा स्टोअर खूपच उपयोगी ठरेल.


टोकिओत येणाऱ्या पर्यटकांच्या यादीत डोरेमॉनचं हे थीम स्टोअर नक्कीच जागा मिळवेल अशी आयोजकांना अपेक्षा आहे. या स्टोअरमध्ये जपानी माणसाचं परफेक्शन ठिकठिकाणी जाणवतं. तर मग कधी जाताय टोकिओत डोरेमॉनला भेटायला?