हेग : पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेला भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) पुढच्या वर्षी १८ ते २१ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुनावणी करणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या मुख्य न्याय विभागानं बुधवारी यासंबंधी एक आदेश जारी केलाय. यामध्ये, कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार असल्याचं म्हटलंय. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं जाहीर केलेल्या पत्रकात, 'मागणीनुसार, सुनावणीचं न्यायालयाच्या वेबसाईटसोबतच ऑनलाईन वेब टीव्ही, संयुक्त राष्ट्र ऑनलाईन टीव्ही चॅनलवर इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग (व्हिओडी) केलं जाईल' असं म्हटलं गेलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी सैन्य न्यायालयानं गुप्तहेरी आणि दहशतवादाच्या आरोपांत ४८ वर्षीय कुलभूषण जाधव यांना एप्रिल २०१७ रोजी मृत्यूदंड ठोठावला होता. याच वर्षी भारतानं मे महिन्यात या निर्णयाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. 


त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १० सदस्यीय खंडपीठानं १८ मे २०१७ रोजी पाकिस्तानला प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यापासून रोखलं होतं.