टोकियो : भारतात लैंगिक छळाविरुद्ध #MeToo अभियान खुपच चर्चिलं गेलं. या मोहिमेद्वारे अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. आता याच धर्तीवर जपानमधल्या महिलांनी #KuToo हे अभियान सुरू केलंय. आपल्यावर सुरु असलेल्या अन्यायाला त्यांनी या मोहिमेद्वारे वाचा फोडलीय. हे अभियान अभिनेत्री तसंच फ्रिलान्स लेखिका युमी इशिकावा हिनं सुरू केलंय. जपानमध्ये हे अभियान 'हाय-हिल्स'च्या (उंच टाचांच्या चप्पल) सक्तीला विरोध करण्याचं हत्यार बनलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानमध्ये महिलांच्या एका समूहाकडून हाय हिल्स परिधान करण्याच्या रुढीविरुद्ध याचिका दाखल करण्यात आलीय. इथे महिलांनी कार्यस्थळी हाय हिल्स परिधान करणं फक्त 'योग्य'च नाही तर 'अनिवार्य'देखील आहे. महिलांच्या एका समूहाद्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आरोग्य आणि श्रम मंत्री तकुमी नेमातो यांनी मात्र हे नियम योग्य असल्याचा निर्वाळा दिलाय. 


जपानमध्ये हाय हिल्सची सक्ती

महिला समूहानं रोजगारासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना कार्यस्थळावर 'हाय हिल्सची सक्ती' मोडीत काढण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. यावर बोलताना तकुमी नेमातो यांनी 'हायहिल्सची सक्ती सामाजिक रुपात स्वीकार करण्यात आलीय. व्यावसायिक रुपात हायहिल्स परिधान करणं योग्यच आहे' असं म्हटलं.


#KuToo म्हणजे काय?


#MeToo प्रमाणेच #KuToo महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारी मोहीम ठरलीय. जपानी शब्द 'कुत्सु' आणि 'कुत्सू' मधून #KuToo हा शब्द वापरला गेला. 


जपानी भाषेतल्या 'कुत्सु' या शब्दाचा अर्थ आहे 'पादत्राण'... तर 'कुत्सू' या शब्दाचा अर्थ आहे 'पीडा'... अभिनेत्री युमी इशिकावा हिनं पहिल्यांदा हायहिल्सच्या सक्ती विरोधात ऑनलाईन अभियान सुरु केल्यानंतर तिला खूपच कमी वेळात हजारोंकडून समर्थन मिळालं.