बापरे! 200 डब्यांची ट्रेन कशी दिसते? व्हिडीओतूनच पाहा कसा असतो 20 तासांचा प्रवास
तब्बल 200 डब्यांची ट्रेन पण एकही सीट नाही; रुळावरून जाताना कशी दिसत असेल ही ट्रेन? डबे मोजता मोजता होईल दमछाक... तिकीट खर्च किती? पाहा....
World News : जगभरातील विविध देशांमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाच्या बळावर रेल्वेचं जाळं प्रवास सोयीचा करताना दिसतं. भारतातही हेच चित्र. किंबहुना आशिया खंडातील आणि जगातील काही मोठ्या रेल्वे जाळ्यांमध्ये भारताची गणना केली जाते. थोडक्यात रेल्वेप्रवास भारतीयांसाठी नवा नाही. कमी अंतराचा प्रवास असो किंवा मग लांब पल्ल्याचा प्रवास असो, रेल्वेमुळं प्रवासातील वेळही कमी होतो आणि एक वेगळाच अनुभव मिळतो ही बाबही तितकीच महत्त्वाची. पण, भारताची हद्द ओलांडून बरंच दूर गेलं असता एक थक्क करणारा रेल्वेप्रवास सर्वांनाच हैराण करून सोडतो.
प्रवासाठी जीवाची बाजी...
भारतातील रेल्वे प्रवासाच्या तुलनेत सर्वात जास्त लांबीच्या या रेल्वेचा प्रवास तसा धोक्याचा. मॉरीतानिया नावाच्या देशात ही रेल्वेगाडी धावते आणि त्यातून प्रवास करणं म्हणजे जीवाचीच बाजी लावणं. खरंतर ही एक मालगाडी (Freight Train) असून, त्यातून प्रवास करणं फार कठीण. प्रवाशांसाठी या ट्रेनमध्ये आसनव्यवस्था नाही आणि शौचालयाचीही व्यवस्था नाही, त्यामुळं अनुभव म्हणून जरी या ट्रेननं प्रवास करायचं म्हटलं तरी अडचणी काही संपणार नाहीत.
हेसुद्धा वाचा : जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल
200 हून अधिक डबे असणाऱ्या या ट्रेनमध्ये एक डबा हा सामान्य प्रवाशांसाठी राखीव आहे. पण, त्यातून लहान मुलांना प्रवास करण्याची मुभा नाही. बऱ्याचदा या ट्रेननं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोखंडाच्या मोठाल्या ढीगांवर बसून प्रवास करावा लागतो, कारण ट्रेनमध्ये एकही Seat नसते. 500 किलोमीटरच्या रस्ते प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत या रेल्वेनं प्रवासाचा वेळ बराच कमी होतो.
आफ्रिकन राष्ट्रामध्ये 1963 ला सुरु झालेल्या या ट्रेनचं नाव आहे ट्रेन डू डेजर्ट (Train Du Desert). साधारण 20 तासांमध्ये ही ट्रेन 704 किमीचा प्रवास पूर्ण करते. सहारा वाळवंटातून (Sahara Desert) वाट काढत पुढे जाणाऱ्या या ट्रेनची लांबी जवळपास 2 किमी इतकी आहे.
वाळवंटातून जाणाऱ्या या ट्रेननं सहसा स्थानिक एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा नोकरीधंद्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करताना दिसतात. बीबीसीच्या एका वृत्तानुसार या ट्रेननं प्रवास करण्यासाठी पैसे भरावे लागत नाहीत. हो, पण या प्रवासात तुम्हाला निसर्गाचा माराही सोसावा लागतो. कारण, वाळवंटातील 49 अंश सेल्शिअस तापमानाचा सामना तुम्हाला करावा लागतो. मग...? अनुभव म्हणून कधी करणार का हा प्रवास?