अन् ३५००० फूट उंचावर प्रवाशांंच्या काळजाचा ठोका चुकला
सिडनी - एअर एशियाच्या विमानात अचानक ऑक्सिजन मास्क खाली आल्याने काहीवेळ प्रवाशांमध्ये गोंधळ झाला.
विमानातील या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाहून इंडोनेशियाला जाणारे एअर एशियाचे विमान सुमारे ३५००० फूट उंच आकाशात झेपावले होते. अशावेळी अचानक केबिन प्रेशर कमी झाल्याने ऑक्सिजन मास्क खाली आल्याची माहिती एअर एशियाकडून देण्यात आली आहे. यानंतर विमान १०००० फूट खाली आले. त्यानंतर हे विमान पर्थला उतरवण्यात आले.
टेक ऑफ केल्यानंतर २५ मिनिटांत हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्येही प्रचंड गोंधळ उडाला. एअर एशियाच्या स्टार्फकडूनदेखील इमरजन्सी लॅन्डिंग करत असल्याने प्रवाशांनी तयार रहावे अशी माहिती देण्यात येत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. या विमानात सुमारे १५१ प्रवाशी होते. हा अनुभव अत्यंत भयंकर आणि हृद्याचा ठोका चुकवणारा होता अशी माहिती या विमानात प्रवाश करणार्यांना अनेकांनी व्यक्त केली आहे.