नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) सुरु असणारा सत्तासंघर्ष साऱ्या जगापुढे अनेक प्रश्न उपस्थित करत असतानाच विनाशाचं एक रुपही दाखवत आहे. यातच आता अफगाणिस्तानवर तालिबाननं वर्चस्व मिळवताच जगभरातून याचे पडसाद उमटू लागले आहेत. नोबेल पारितोषिक विजेती आणि मानवाधिकारांसाठी लढा देणारी मलाला युसूफझाई हिनंही धगधगत्या अफगाणिस्तान संघर्षाच्या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विट करत व्यक्त केल्या भावना... 
मलालानं (Malala) सदर घटनेबाबत ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. 'तालिबाननं अफगाणिस्तान ताब्यात घेतलं आणि आपण मात्र स्तब्ध होऊन हे पाहत आहोत. मी महिला, अल्पसंख्यांक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांसाठी चिंतातूर आहे. जागतिक संघटनांनी तात्काळ हा संघर्ष थांबवण्याची मागणी केली पाहिजे. शिवाय तिथं मदही पोहोचवली पाहिजे. शरणार्थी आणि तेथील नागरिकांना संरक्षण द्या', अशी मागणी तिनं केली. 


ही घटना आपल्याला पुरता हादरा देऊन गेली आहे, असं म्हणत मलालानं या देशातील महिला आणि अल्पसंख्यांकांच्या तसंच मानवी हक्कांच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आणि हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या मलालावर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. 


गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या मलालावर प्रथम पाकिस्तानात उपचार झाले, ज्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला ब्रिटनला पाठवण्यात आलं होतं. या हल्ल्यानंतर तालिबाननं (Taliban) मलालावर ती वाचल्यास पुन्हा हल्ला करु असा इशारा दिला होता. 


दरम्यान, हल्ला आणि या धक्क्यातून सावरलेल्या मलालानं आता अफगाणिस्तानमध्ये तात्काळ हा संघर्ष थांबवण्याची मागणी जागतिक संघटनांकडे केली आहे, शिवाय अफगाण नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्याचं आवाहन तिनं सर्वांना केलं आहे.