मलालाची घरवापसी, ६ वर्षांनी आली पाकिस्तानात
मलाला गुरूवारी सकाळी दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले.
कराची : नोबेल शांति पुरस्कार विजेता मलाला यूसुफजई सहा वर्षांनंतर आपल्या देशात परतली आहे. तालिबानी दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर ती पहिल्यांदाच पाकिस्तानात पोहोचली. २०१२ मध्ये पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणाचे अभियान चालविल्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला केला. मोठ्या उपचारानंतर तिला वाचविण्यात यश आले. या घटनेनंतर मलला पाकिस्तान सोडुन इंग्लंडला राहू लागली होती. मलाला गुरूवारी सकाळी दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिच्या प्रवासाबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. मलाला युसुफजईला आपल्या आईवडिलांसोबत कडेकोट सुरक्षेमध्ये इस्लामाबादच्या बेनजीर भुट्टो आंतरराष्ट्री विमानतळावर पाहिले गेले. स्थानिक प्रसारमाध्यमं आणि फोटोग्राफ्सच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांशी भेट ?
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मलाला ४ दिवसांसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दरम्यान ती पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांची भेट घेऊ शकते.
काय आहे मलालाची कहाणी ?
१४ वर्षाच्या मलाला युसुफजाईने वयाच्या ११व्या वर्षी तालिबान्यांविरोधात आवाज उठवला होता. तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याचा फतवा काढला होता. त्याचा मलालाने विरोध केला होता. २००९ मध्ये बीबीसीच्या उर्दू ब्लॉगवर टोपण नावाने तिने लिखाण सुरु केलं. तालिबान्यांच्या अत्याचाराला तिने ब्लॉगच्या माध्यमातून वाचा फोडली होती. तोफांच्या भडिमारालाही न घाबरणारे तालिबानी मलालाच्या लिखाणामुळे हादरुन गेले होते.
तालिबान हारलं खरं पण त्यांच्या भ्याड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मलालाच्या प्रत्येक श्वासाने स्वात खोऱ्यात नव्या क्रांतीला जन्म दिला होता. स्वात खोऱ्यात मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरु लागला आहे. तसेच मलाला लवकर बरी व्हावी यासाठी जगभर प्रार्थना केली गेली.
मलालाला उपचारासाठी स्वात खोऱ्यातून रावळपिंडीच्या सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं तिच्या डोक्यात घुसलेली गोळी काढण्यात आली. पण तिची प्रकृती नाजूक बनल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी ब्रिटनला हलवण्यात आल होत. आता या घटनेला ६ वर्षे झाली. यानंतर पहिल्यांदाच ती पाकिस्तानात आली आहे.