फेसबुकचा सीईओ दुसऱ्यांदा घेणार `पॅटर्निटी लिव्ह`
फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग दुसऱ्यांदा पिता बनणार आहे.
सॅन फ्रान्सिस्को : फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग दुसऱ्यांदा पिता बनणार आहे.
पुन्हा एकदा मार्कच्या घरी एका चिमुरड्याचं आगमन होणार आहे. मार्क आणि त्याची पत्नी या क्षणाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. २०१५ मध्ये मार्कच्या पहिल्या मुलीचा म्हणजेच मॅक्सचा जन्म झाला होता. तेव्हाही त्यानं दोन महिन्यांची सुट्टी (पॅटर्निटी लिव्ह) घेतली होती.
पत्नी प्रिसिला आणि मुलींसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी आणि हा आनंद शेअर करण्यासाठी मार्कला त्यांच्यासोबत राहायचंय. यासाठी मार्क सुरुवातीला एक महिन्याची सुट्टी घेणार आहे त्यानंतर तो पुन्हा डिसेंबरमध्येही एका महिन्याची सुट्टी घेणार आहे.
'फेसबुक'मधील कर्मचाऱ्यांना आम्ही चार महिन्यांची पालकत्व रजा उपलब्ध करून देतो. काम करणारा व्यक्ती नवजात बालकांसोबत राहणं, हे संपूर्ण कुटुंबासाठी फायदेशीर असतं असं संशोधनातून समोर आलंय. मला खात्री आहे की मी सुट्टी संपवून परतेल तेव्हा संपूर्ण ऑफिस माझ्यासोबत असेल, असं मार्कनं म्हटलंय.