मुंबई : पनामा पेपर प्रकरणात दोषी ठरवलं गेल्यानंतर नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं. पाकिस्तान सुप्रीम कोर्टाकड़ून पनामा पेपर लीक प्रकरणात शरीफ यांना दोषी ठरवल्यानंतर पंतप्रधान पदासाठी अयोग्य ठरवण्यात आलं. न्यायालयानं शरीफ आणि त्यांच्या मुलांविरोधात भ्रष्टाचाराचं प्रकरण दाखल करून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टचाराच्या आरोपाखाली १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच त्यांची मुलगी मरियम हिला देखील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ७ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नवाज शरीफ यांच्या जावयाला एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता नवाझ शरीफ आणि मरियम निवडणूक लढवू शकणार नाहीत. उल्लेखनीय म्हणजे, नवाझ शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर तीन वेळा आरूढ झाले परंतु, एकदाही आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीफ कुटुंबीयांच्या परदेशातील संपत्तीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीसमोर नवाझ शरीफ यांची मुलगी मरियमनं एक छोटीशी चूक केली आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. या छोट्याशा चुकीमुळेच शरीफ यांना पदावर पाणी सोडावं लागलं... आणि तुरुंगातही जावं लागलं.


शरीफ यांच्या कुटुंबीयांची परदेशातील संपत्ती गोळा करण्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं जेआयटी गठीत केली होती. जेआयटीनं १० जुलै रोजी आपला अहवाल कोर्टासमोर सादर केला. यादरम्यान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम चौकशी यंत्रणांना चकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं. मरियमनं पनामा गेटशी निगडीत २००६ सालचे कागदपत्रं सादर केले होते ते 'कॅलिबरी फॉन्ट'मध्ये टाईप करण्यात आले होते... परंतु, २००६ साली हा फॉन्ट वापरातच नव्हता... हा फॉन्ट ३१ जानेवारी २००७ मध्ये पहिल्यांदा व्यावसायिक प्रयोगासाठी उपलब्ध करण्यात आला. मरियमची हीच चूक तिच्यासाठी आणि शरीफ यांच्यासाठी घोडचूक ठरली.