Haiti Earthquake: जगभरात पूर, महामारी, दहशतवादी हल्ले अशा घटनांचं सत्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. मानवाच्या जगण्याचा हा संघर्ष गेले कित्येक दिवस सुरु आहे. संकटाच्या याच साखळीत आणखी भर पडली ती म्हणजे एका अतीतीव्र स्वरुपाच्या भूकंपाच्या हादऱ्यानं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी कॅरेबियन राष्ट्र हैती येथे 7.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा जबर भूकंप आला. ज्यामुळं रविवारपर्यंत या आपत्तीमध्ये जीव गमावणाऱ्यांचा आकडा 1400 वर पोहोचला आहे. इथं भूकंपानंतर देण्यात आलेला वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा पाहता बचावकार्याला वेग देण्यात आला आहे.


हैतीमध्ये आलेल्या या भूकंपामुळं जवळपास 5700 हून अधिक नागरिक जखमी असल्याचं कळत आहे. तर, बेघर होणाऱ्यांचा आकडाही हजारोंच्या संख्येत आहे. देशात उष्णतेची लाट आलेलली असल्यामुळं लोकं मोकळ्या जागांमध्येच जात आहेत. तर रुग्णालयांमध्ये उपचाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांच्या रांगा वाढतच चालल्या आहेत. हैतीमध्ये आलेली ही संकटाची लाट इतक्यावरच थांबलेली नसून, ग्रेस नावाचं वादळ इथं धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, शनिवारी हैतीच्या दक्षिणपश्चिम भागात भूकंप आल्यामुळे अनेक शहरं उध्वस्त झाली. भूस्खलनामुळं बचावकार्यातही अडचणी येऊ लागल्या. भूकंपामुळं कोरोनाचा मारा सोसणाऱ्या हैतीमधील नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. हैतीचे पंतप्रधान एरियल हेनरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी मदत पोहोचणं कठीण आहे, तिथं मदत पोहोचवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी शक्य आणि उपलब्ध त्या सर्व मार्गांचा वापर करण्यात येत आहे. येत्या एका महिन्यासाठी या देशात आपात्कालीन आणिबाणीची घोषणा करण्यात आली आहे.


हैतीच्या नागरिक सुरक्षा कार्यालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार या भुकंपामध्ये 7000हून अधिक घरं नष्ट झाली आहेत. तर, 5000 पेक्षाही जास्त घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संसाधनांची कमतरता आणि कोरोनाचं दिवसागणिक गडद होणारं संकट समोर असतानाच आलेला हा भूकंप विनाशाची दाहक रुपं दाखवत आहे.