न्यूयॉर्क : अमेरिकी फास्ट-फूड चेन मॅकडॉनल्डने, कंपनीच्या सीईओला (मुख्य कार्यकारी अधिकारी) कामावरुन काढून टाकलं आहे. कंपनीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. स्टिव्ह ईस्टरब्रुक यांची कंपनीच्या सीईओ पदावरुन हकालपट्टी केली आहे. स्टीव ईस्टब्रुक यांचे कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याने त्यांना कामावरुन काढून टाकल्याची माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या नियमांनुसार, वरिष्ठ व्यवस्थापनास अन्य कर्मचार्‍यांशी संबंध ठेवण्यास बंदी आहे. ईस्टरब्रुक यांनी कंपनीतील सहकाऱ्याशी संबंध ठेवून कंपनीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.


एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ईस्टरब्रुक यांनी एका ईमेलमध्ये आपल्या प्रेमसंबंधाचा स्वीकार करत, त्यांनी आपली चूक मान्य केली आहे. ईस्टरब्रुक यांनी ईमेलद्वारे कंपनीचा निर्णय मान्य असल्याचं सांगितलं आहे.


  


ईस्टरब्रुक (५२) यांना कामावरुन काढून टाकल्यानंतर आता कंपनीचे अमेरिकेतील प्रमुख क्रिस कँपजिंस्की यांची कंपनीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.