नवी दिल्ली : नुकतंच एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्यानंतर लोकांमध्ये खाण्या-पिण्याचं सामान ऑर्डर करताना भीतीचं वातावरण आहे. अशातच आता बहुराष्ट्रीय कंपनी मॅकडॉनल्ड्सच्या सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ही घटना सिंगापूरमधील आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कंपनीने काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मॅकडॉनल्डद्वारा काम बंद करण्याचा निर्णय ड्राईव्ह थ्रू (वाहनावरुन न उतरता ऑर्डर देण्याची सुविधा) आणि वितरणासाठीही घेण्यात आला आहे. कंपनीने त्यांची टेकअवे सेवा शनिवारपासून थांबवली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार कंपनीने आपल्या रेस्टॉरंट्स, डिलिव्हरी आणि ड्राईव्ह थ्रू ऑपरेशन्स 4 मेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.


कंपनीचे सिंगापूरचे व्यवस्थापकीय संचालक केनेथ चान यांनी सांगितलं की, 'हा काळ आपल्या सर्वांसाठीच अतिशय कठीण आहे. आम्ही आमच्या ग्राहक आणि कर्मचार्‍यांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी शक्य तितक्या खबरदारीची पावलं उचलली आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरु ठेवू' 


सिंगापूरमध्ये 135 रेस्टॉरंट्समधील जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांना वेतन देणं सुरुच राहणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 


सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाच्या वृत्तानुसार, शनिवारी देशात कोरोना विषाणूचे 942 नवीन रुग्ण आढळले आहेत. 


दरम्यान, जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. जगात कोरोनामुळे आतपर्यंत 1 लाख 65 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 24 लाख 6 हजार 800वर पोहचली आहे.