जेव्हा सापाने रोखली रस्त्यावरील वाहतूक
सापाला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. सापाला पाहताच कुणी पळ काढतो तर कुणी घाबरुन शांतपणे उभं राहतं. मात्र, आता एक वेगळीच घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : सापाला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. सापाला पाहताच कुणी पळ काढतो तर कुणी घाबरुन शांतपणे उभं राहतं. मात्र, आता एक वेगळीच घटना समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका सापामुळे चक्क रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे.
विषारी होता साप
मिळालेल्या माहितीनुसार, मेलबर्नमधील कोलिंस रोड आणि स्पेंसर स्ट्रीट येथे अचानक साप दिसला. हा एक टायगर स्नेक होता जो खूप विषारी असतो. लोकांनी सापाला पाहताच त्यांनी पळापळ सुरु केली. त्यानंतर याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. मग, रस्त्यावरी संपूर्ण वाहतूक रोखण्यात आली.
सिटी ऑफ मेलबर्नने यासंबंधी ट्विटही केलं आहे. ट्विटरवर सापाचा फोटो शेअर करत म्हटलयं की, जर तुम्ही कोलिंस मार्गावरुन आणि स्पेंसर स्ट्रीटकडे जात असाल तर दुसऱ्या मार्गाने जा. आम्ही एका सापाला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत.
जखमी होता साप
सर्प मित्रांना बोलावण्यात आले आणि त्यांनी सापाला पकडून रस्त्यावरुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं. या सापाचा फोटोही युजर्सने ट्विटरवर शेअर केला. सर्प मित्रांनी सापाला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली.
प्रसारमाध्यमांसोबत चर्चा करताना घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी म्हटलं की, साप जखमी होता त्यामुळे तो रस्त्यावरुन दुसरीकडे जात नव्हता. रस्त्यावरील एखाद्या गाडीमुळे तो जखमी झाला असावा.