कोरोना: अमेरिकेत मृतांचा आकडा 98 हजारांच्या वर
एकीकडे मृतांचा आकडा वाढतोय आणि ट्रम्प लॉकडाऊन हटवण्याच्या प्रयत्नात
वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनामुळे मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. हा आकडा एक लाखाजवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत कोरोनामुळे 532 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृत्यूची संख्या 98218 वर पोहोचली आहे, जी जगात सर्वाधिक आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाच्या 16 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. जे जगात सर्वात जास्त आहे. एकीकडे अमेरिकेत मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे, तर देशातील व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून सुरु आहे. राज्यांना देखील त्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. जर राज्य तसं करत नसतील तर ते व्यवहार सुरु करण्याचे आदेश देतील असा देखील इशारा देण्यात आला आहे.
उत्तर कॅरोलिनाच्या राज्यपालांना देखील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खास इशारा दिला आहे. वास्तविक, काही काळानंतर रिपब्लिक पार्टीचे अधिवेशन कॅरोलिना येथे होणार आहे, हाच कार्यक्रम आहे जिथे डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा रिपब्लिक पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडले जाणार आहेत.
अमेरिकेत लवकरच राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. पण देश आर्थिक अडचणीत आहे. त्यांना देशाला निवडणुकीच्या आधी आर्थिक अडचणीतून बाहेर काढायचं आहे. त्यामुळे त्यांचा हा सगळा प्रयत्न सुरु आहे.