मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींचं कुटुंब आशियातील सगळ्यात श्रीमंत आहे. फोर्ब्ज मासिकानं आशियातील ५० सगळ्यात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत. अंबानींची एकूण संपत्ती २.९१ लाख कोटी रुपये आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत अंबानींच्या संपत्तीमध्ये ७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजेच एकूण संपत्ती १.२३ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्जनं बुधवारी आशियातील ५० श्रीमंत परिवारांची यादी घोषीत केली होती. या कुटुंबांची संपत्ती ४५.४३ लाख कोटी रुपये एवढी आहे. एक वर्षामध्ये या कुटुंबांची संपत्ती ३५ टक्के वाढली आहे.


दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियाचं कुटुंब


फोर्ब्जच्या या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियाचं ली कुटुंब आहे. ली कुटुंबाकडे २.६५ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. ली परिवार कोरियातील सगळ्यात मोठी कंपनी सॅमसंगचा प्रमोटर आहे. मागच्या एका वर्षात सॅमसंगच्या शेअर्समध्ये ७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ली कुटुंबाची नेटवर्थ ७२,८०० कोटी म्हणजेच २८ टक्क्यांनी वाढली आहे. मागच्यावर्षी १.९२ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत ली कुटुंब आशियातील सगळ्यात श्रीमंत होतं.


पहिल्यांदाच भारतातील एवढ्या कुटुंबांचा समावेश


फोर्ब्जच्या या यादीमध्ये सहगल (टीएसजी) आणि वाडिया यांच्यासोबतच सहा कुटुंबांचा समावेश आहे. सहगल कुटुंब ४० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत ४१व्या क्रमांकावर आहे तर वाडिया जवळपास एवढ्याच संपत्तीसोबत ४२व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये सर्वात जास्त १८ कुटुंब भारतीय आहेत. तर हाँगकाँगची ९ कुटुंब या यादीमध्ये आहेत. फोर्ब्जनं ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या शेअर्सच्या किंमतीनुसार ही यादी बनवली आहे.


अंबानींची संपत्ती सर्वाधिक वाढली 


मुकेश अंबानी कुटुंबाच्या संपत्तीमध्ये सर्वात जास्त ७४ टक्के वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचची ऑईल रिफायनिंग मार्जिन वाढल्यामुळे आणि जिओच्या यशामुळे कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षात ७८ टक्के वाढ झाली. 


आशियातले टॉप ५ श्रीमंत कुटुंब 


कुटुंब  कंपनी देश संपत्ती  
अंबानी  रिलायन्स भारत २.९१ लाख कोटी
ली सॅमसंग दक्षिण कोरिया २.६५ लाख कोटी
क्वोक सुन हंग काय प्रॉपर्टीज हाँगकाँग २.६२ लाख कोटी 
चियारावानोंत चॅरोईन पोकफांद ग्रुप थायलंड २.१८ लाख कोटी 
हारतोनो  तंबाखू व्यापारी इंडोनेशिया २.०८ लाख कोटी