नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान एकटा पडला आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेत देखील ही गोष्ट पाहायला मिळाली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने त्यांच्या प्रश्नांचा भडिमार केला. त्यानंतर इम्रान खान यांनी म्हटलं की, तुम्हाला माझाकडून काय हवं आहे? आपण काय करावं.? काय आपण भारतावर हल्ला करायचा का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ आणि इम्रान खान यांच्यात झालेल्या चर्चेत लाचारी दिसत होती. इम्रान खान यांनी म्हटलं की, ते जगभरातील नेत्यांना फोन करुन मदत मागत आहेत. काश्मीरच्या बाबतीत प्रत्येक विकल्पावर विचार सुरु आहे. त्यांनी विरोधकांना विचारलं की, तुम्हीच सांगा काय करावं. त्यावर शहबाज बोलले की, आपण आपली बाजू ठामपणे मांडली पाहिजे आणि या अडचणीच्या काळात देशाचा उत्साह वाढवायला पाहिजे.'


इम्रान खान काश्मीरचा मुद्दा उचलत आहेत. पण त्यांच्यासोबत कोणताही देश उभा राहत नाही. इतकंच नाही तर मुस्लीम देशांचीदेखील साथ त्यांना मिळालेली नाही.


गल्फ न्यूजच्या एका रिपोर्ट्सनुसार यूएईच्या राजदुतांनी भारतच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इतर अनेक मुस्लीम देश काश्मीरच्या मुद्द्यावर भारत सरकारच्या निर्णयावर शांत आहेत. यूएईने मात्र भारताचं उघड समर्थन केलं आहे.


मालदीव सरकारने म्हटलं की, भारताने अनुच्छेद 370 च्या बाबतीत घेतलेला निर्णय हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. सगळ्या राष्ट्रांकडे कायद्यात बदल करण्याचा अधिकार आहे.


सऊदी अरबच्या न्यूज एजेंसीने म्हटलं की, 'सऊदी क्राउन प्रिंसला पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी क्राउन प्रिंस यांना काश्मीरच्या बाबतीत माहिती दिली.' पण सऊदी अरबकडून पाकिस्तान समर्थन मिळालं नाही.


पाकिस्तानचा सहकारी असलेल्या चीनने देखील काश्मीर मुद्द्यावर काहीही वक्तव्य केलं नाही. चीनने फक्त लद्दाखवर वक्तव्य केलं. कारण चीन आतापर्यंत लद्दाखवर आपला अधिकार सांगत आला आहे.


चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता हुवा चुनयिंग यांनी म्हटलं की, 'काही दिवसांपूर्वीच भारताने आपल्या अंतर्गत कायद्यात बदल केला आहे. ज्यामुळे चीनचं क्षेत्रीय संप्रभुता कमजोर करता येईल. हे अस्वीकार्य आहे.'


अमेरिकेकडून ही पाकिस्तानला अपेक्षा होती. पण अमेरिकेने देखील यावर कोणतीच भूमिका घेतली नाही. भारत सरकारने घेतलेला निर्णय हा अंतर्गत असल्याचं त्यांनी म्हटलं.


तुर्कचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी पाकिस्तानचं समर्थन केलं असलं तरी त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार, 'एर्दोगान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर समर्थन केलं आहे.' पण तुर्क भारतासोबतचे व्यापार आणि संबंध बंद करेल अशी कोणतीही शक्यता नाही.


इम्रान खान यांनी यूकेने नवे पंतप्रधान जॉनसन यांना ही फोन केला. पण यूकेकडून काश्मीरच्या मुद्द्यावर कोणतंच वक्तव्य आलेलं नाही. दुसरीकडे ब्रिटेनचे परराष्ट्र सचिव डोमिनिक राब यांनी म्हटलं की, काश्मीरमधील परिस्थितीवर भारताने घेतलेल्या निर्णयावर चिंता व्यक्त होत आहे. पण भारत सरकारचं दृष्टीकोनातूनही आम्हाला परिस्थिती समजत आहे.'


श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी ट्विट करत म्हटलं की, जम्मू-काश्मीर पासून लद्दाख वेगळा झाला आहे. लद्दाखमध्ये ७० टक्के लोकं बोद्ध धर्माचे आहेत. त्यामुळे लद्दाख हे भारतातलं पहिलं राज्य आहे जेथे बौद्ध लोकं अधिक आहेत. राज्यांना वेगळं करणं हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. लद्दाख खूप सुंदर जागा आहे.'