नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांनुसार, भारतात पुन्हा एकदा भाजपा सरकार येणार असल्याचे दिसत आहे. सध्याच्या आकड्यांनुसार, भाजपाने 347 चा आकडा पार केला आहे. पुन्हा एकदा मोदींना मिळालेल्या यशानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतातूनच नाही तर परदेशातूनही मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणूक 2019 साठी भारतभरात जितकी उत्सुकता आहे. तितकीच उत्सुकता परदेशात पाहायला मिळत आहे. भारताव्यतीरिक्त इतर देशांतील लोकही या निकालावर लक्ष ठेऊन आहेत. परंतु अमेरिकेत राहणाऱ्या मोदींच्या एका चाहत्याने लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरच बूक केले आहे. 


मोदींच्या या चाहत्याने, लोकांना लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल पाहता यावा यासाठी मिनिएपोलिसमध्ये संपूर्ण थिएटर बूक केले आहे. या चाहत्याचे नाव रमेश नूने असून तो आयटी प्रोफेशनल आहे. 


रमेश नूने यांनी विविध टिव्ही न्यूज चॅनेलद्वारा चित्रपटगृहात निवडणुकीच्या निकालांच्या स्क्रिनिंगचे आयोजन केले आहे. लोकांना सकाळी अमेरिकी वेळेनुसार, साडे नऊ वाजल्यापासून निवडणुकांचे निकाल मिळण्यास सुरुवात झाली होती. 


जवळपास 150 लोकांनी या थिएटरचे तिकीट खरेदी केले आहे. या तिकीटाची किंमत 15 डॉलर म्हणजेच जवळपास 1 हजार रुपये इतकी आहे.