Sunita Williams: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात झेप घेतली. यानंतर त्यांनी आपल्या आनंदाचा क्षण सर्वांसोबत शेअर केला होता. जगभरातून त्यांचे कौतुक केले गेले. दरम्यान सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? हा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे. अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणाऱ्या बोइंग स्टारलाइनरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुनिता विल्यम्स यांच्या चाहत्यांसाठी ही बातमी थोड टेन्शन वाढवणारी ठरतेय. अंतराळवीरांच्या पहिल्या गटाला घेऊन जाणाऱ्या स्टारलाइनरचे परतणे पुढे ढकलण्यात आले आहे. एअरक्राफ्टच्या खराबीमुळे ही अडचण येत आहे. सुनीता विल्यम्ससह या टीममधील सदस्य कधी परतणार याची नवी तारीख नासाने अद्याप दिलेली नाही.


26 जूनचे होते नियोजन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतराळयानाचे परतीचे नियोजन यापूर्वी २६ जून रोजी होणार होते. याआधी तीनदा रिटर्न पुढे ढकलण्यात आले आहे. नासाला हे मिशन अत्यंत काळजीपूर्वक, सावधगिरीने पूर्णत्वास न्यायचे आहे. यात त्यांना छोटीशीही चूक करायची नाहीय. 6 तासांच्या उड्डाणात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.  नासा कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. विशेष म्हणजे या मिशनचे प्रक्षेपणही याआधी दोनदा पुढे ढकलण्यात आले आहे. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात 322 दिवस वास्तव्य केले आहे. अशा परिस्थितीत जगभरातील लोकांच्या हृदयाचे ठोके आता वाढू लागले आहेत.


21 वर्षांपूर्वी कल्पना चावलांसोबत दुर्घटना 


21 वर्षांपूर्वी अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कल्पना चावला यांना अंतराळ मोहिमेदरम्यान अपघात झाला. त्यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. 2003 मध्ये कोलंबिया हे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच ते कोसळले होते. भारतीय वंशाची आणखी एक अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर परतण्याचे प्रयत्न तीनदा थांबवण्यात आले आहेत. दरम्यान यावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नासा पुन्हा एकदा सतर्क झाले आहे.


सुनीता विल्यम्स 5 जून रोजी गेल्या होत्या अंतराळात 


अमेरिकन अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांनी ५ जून रोजी उड्डाण केले. ज्या अंतराळयानातून सुनीता त्यांच्या साथीदारांसह अवकाश मोहिमेवर गेल्यायत ते यान अनेकवेळा खराब झाले आहे.  बोईंगचा स्टारलाइनर प्रोग्राम अनेक वर्षांपासून सॉफ्टवेअरमधील त्रुटी, डिझाइन समस्या आणि उपकंत्राटदारांसोबतच्या वादांत अडकला आहे. 6 जून रोजी जेव्हा स्टारलाइनर स्पेस स्टेशनला डॉक करण्यासाठी पोहोचले तेव्हा थ्रस्टर फेल्युअर दिसून आले. यामुळे बिघाड दूर होईपर्यंत अंतराळयान अंतराळ स्थानकाजवळ गेले नाही.


अंतराळवीर पृथ्वीवर कसे परतात?


पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर, अंतराळ यान 28,000 किमी/तास वेग कमी करण्यास सुरवात करेल. पुन्हा प्रवेश केल्यानंतर पॅराशूट यंत्रणेचे संरक्षण करण्यासाठी अंतराळ यानाची पुढील उष्णता ढाल काढली जाते. अंतराळ यानाचा वेग ताशी 6 किलोमीटर इतका असतो. पण हे सर्व खूपच आव्हानात्मक असते.


अंतराळ मोहिमा अत्यंत धोकादायक 


कोणत्याही अंतराळ मोहिमेतून परतणे अत्यंत जोखमीचे असते. स्टारलाइनरने जवळपास 6 तासांचा परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांना थ्रस्टर फेल्युअर, व्हॉल्व्हची समस्या आणि हेलियम गळतीची कारणे अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहेत. स्टारलाइनरच्या सध्याच्या फ्लाइटमध्ये, फक्त एक थ्रस्टर डेड अवस्थेत आहे. नासाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.