ओटावा : कॅनडातला प्रसिद्ध धबधबा नायगरा फॉल गोठला आहे. हे सुंदर दृश्य पाहायला पर्यटकांची पावलं कॅनडाकडे वळू लागली आहेत. गोठलेल्या नायगरा धबधब्याचे सुंदर दृश्यं डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. कॅनडामध्ये नायगरा धबधबा वाहतो त्या ठिकाणाचे नाव ओंटारिओ. सध्या ओंटारिओमध्ये उणे २५ ते ४० अंश तापमान आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये हे तापमान आणखी खाली जाईल आणि धबधबा आणखी गोठेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


पडणाऱ्या पाण्याचा क्षणार्धात बर्फ



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी थंडीत हा धबधबा थोड्या फार प्रमाणात गोठतो. साधारणपणे संपूर्ण जानेवारी महिना आणि फेब्रुवारीचे सुरुवातीच्या दिवसांत हा धबधबा गोठलेला असतो. यंदाही हा धबधबा तसाच गोठला आहे. धबधब्यामधले डोंगरावरुन पाणी खाली पडत आहे. पण खाली पडताक्षणी पाणी गोठून जाते आहे. त्यामुळे वरुन पडणाऱ्या पाण्याचा क्षणार्धात बर्फ होतानाचे विहंगम दृश्य पर्यटकांना पाहायला मिळत आहे. 


गोठलेल्या धबधब्याचे विहंगम दृश्य


१८४८ मध्ये हा धबधबा पूर्णपणे गोठला होता. त्यानंतर २०१४ साली नीचांकी तापमान या धबधब्यामध्ये होते. पण तरीही थोडंसं पाणी वाहतं होते.  एकोणीसाव्या शतकात तर या गोठलेल्या धबधब्यावरुन फिरण्याचा आनंद पर्यटक घ्यायचे. पण त्यातला धोका लक्षात घेऊन १९१४ साली त्यावर बंदी घालण्यात आली. या गोठलेल्या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. गोठलेल्या धबधब्याबरोबर सेल्फी काढण्याचीही पर्यटकांची स्पर्धा लागत आहे. अनेक पर्यटकांनी नायगरा धबधब्याबरोबरचे सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.




बर्फ कापत जाणाऱ्या ट्रेनचे व्हिडिओ व्हायरल


गेल्या काही दिवसांत थंडीत बर्फ कापत जाणाऱ्या ट्रेनचे व्हिडिओही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झालेत. स्नो प्लो ट्रेन असे या ट्रेन्सना म्हटले जाते. युरोपामध्ये अशा ट्रेन सर्रास पाहायला मिळतात. रेल्वे रुळांवर पडलेला बर्फ काढून टाकण्यासाठी या अशा ट्रेन्सचा वापर केला जातो. १८५० मध्ये या ट्रेनचा शोध लागला. वेज प्लो किंवा बकर प्लो नावानंही या ट्रेन ओळखल्या जातात. अतिशय वेगात बर्फ कापत ही ट्रेन धावते. रेल्वेगाड्यांच्या इंजिनच्या समोर हे स्नो प्लो नावाचं मशीन बसवले जाते. या मशीन्सच्या खाली बर्फ कापणारं ब्लेड असते. या ब्लेडच्या मदतीनं बर्फ कापला जातो. आणि रेल्वे रुळ बर्फमुक्त केले जातात, अशी स्नो प्लोची मशीन्स पुरवणाऱ्या अनेक कंपन्या युरोपामध्ये आहेत. अशा प्रकारची ट्रेन कित्येक वर्षं जुनी असली तरी गेले काही दिवस या ट्रेनचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.