वॉशिंग्टन : मुस्लीमबहुल 6 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेला वादग्रस्त आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्दबातल ठरवण्याच्या राज्यांच्या न्यायालयांनी दिलेले अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. त्यामुळे इराण, लीबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशांच्या नागरिकांना 90 दिवस अमेरिकेत प्रवेश करण्यास मज्जाव करणे ट्रम्प प्रशासनास आता शक्य होणार आहे.


न्यायालयानं या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यामुळे आता ही बंदी 72 तासांत लागू केली जाईल असे ट्रम्प यांनी याआधीच स्पष्ट केले होते.  'तत्पूर्वी 7 मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेमध्ये नो एन्ट्री लागू करण्यात आली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा फतवा काढला होता. राज्यांच्या न्यायालयांनी ट्रम्प यांचा निर्णय रद्द केल्यानंतर त्यांनी 6 देशांच्या नावाचा प्रतिबंध यादीत समावेश केला होता. या संबंधीचा एक नवा आदेश जारी करण्यात आला होता, याद्वारे 6 मुस्लीम देशांतील निर्वासितांनी अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली होती. सुदान, सिरीया, इराण, लिबिया, सोमालिया आणि येमेन या मुस्लीम देशातील लोकांना अमेरिकेत बंदी कायम ठेवली आहे.