प्योनगँग : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाल्यानंतर किम जोंग मृत्यूशी झुंज देत असल्याचं बोललं जात आहे. चीनमध्ये तर किम जोंग यांचा मृत्यू झाल्याचीही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे किम जोंग उन यांची स्पेशल ट्रेन उत्तर कोरियाच्या एका रिसॉर्टबाहेर दिसल्याचं वृत्त आहे. २१ आणि २३ एप्रिलला वोन्सानच्या लिडरशीप स्टेशनवर किम जोंगची ट्रेन पाहण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किम जोंग यांच्या आयुष्याप्रमाणेच त्याची 'द बिग ट्रेन'देखील एक मोठं गूढ आहे. मार्च २०१८ साली किम जोंग चीनच्या दौऱ्यावर या ट्रेनने गेले होते. किम जोंग यांच्या वडिलांनीही डिसेंबर २०११ साली मृत्यू व्हायच्या आधी याच ट्रेनने परदेश दौरे केले होते. हिरव्या रंगाच्या या ट्रेनवर पिवळ्या रंगाचे पट्टे आहेत.


काय आहे किम जोंग यांच्या ट्रेनमध्ये?


किम जोंग यांच्या या ट्रेनमध्ये जवळपास ९० डब्बे आहेत. यामध्ये कॉन्फरन्स रूम, ऑडियन्स चेंबर, बेडरूम आणि सॅटलाईट फोन-टीव्ही कनेक्शन आहे. उत्तर कोरियातल्या एका रिपोर्टनुसार किम जोंग इल म्हणजेच किम जोंग यांच्या वडिलांचा मृत्यूही याच ट्रेनमध्ये झाला होता. या ट्रेनमध्ये जगातली सगळ्यात महाग वाईन मिळायची. तसंच ट्रेनमध्ये शानदार पार्टीही होत असे. किम जोंग इल यांनी या ट्रेननं जवळपास १०-१२ दौरे केले. यामध्ये सर्वाधिक दौरे चीनचे होते.


९० डब्ब्यांची बुलेटप्रुफ ट्रेन


९० डब्ब्यांच्या या ट्रेनचा प्रत्येक डबा बुलेटप्रुफ आहे. सामान्य रेल्वे डब्ब्यापेक्षा या ट्रेनच्या डब्ब्याचं वजन खूप जास्त आहे. जास्त वजनामुळे या ट्रेनचा वेग कमी आहे. ताशी ३७ मैल वेगाने ही ट्रेन धावते. २००९ सालच्या रिपोर्टनुसार किम जोंग इल यांच्या काळामध्ये या ट्रेनमध्ये १०० सुरक्षा अधिकारी असायचे. स्टेशनचा तपास करण्याचं मुख्य काम या अधिकाऱ्यांकडे असायचं. याचबरोबर सुरक्षेसाठी या ट्रेनच्या वरून सैन्याचं हेलिकॉप्टर आणि विमानंही जायची.



किमची स्वत:ची २२ स्टेशन


उत्तर कोरियामध्ये किम यांची स्वत:ची २२ स्टेशन आहेत. या स्टेशनचा उपयोग फक्त किम जोंग उनच करतात. २०१५ साली किम जोंग उन याच ट्रेनच्या एका डब्ब्यात मोठ्या पांढऱ्या टेबलवर बसलेले दिसले होते.


किम जोंगचं विमान


किम जोंगनी आत्तापर्यंत तीनवेळा चीनचा दौरा केला. सत्ता सांभाळल्यानंतर किम जोंग पहिल्यांदा चीनला विमानानं गेले. ज्या विमानानं किम जोंग चीनला गेले ते विमान रशियामध्ये बनवण्यात आलं आहे. द इल्यूशिन-62 (II-62)या विमानानं किम जोंगनी चीनचा प्रवास केला. किम जोंग यांचं हे विमान पांढरं असून त्याच्या बाहेरच्या बाजूला कोरियन भाषेत मोठ्या अक्षरांमध्ये उत्तर कोरिया लिहिण्यात आलं आहे. तसंच या विमानावर उत्तर कोरियाचा झेंडाही आहे. विमानाच्या मागच्या भागावर निळ्या आणि लाल रंगाच्यामध्ये एक चांदणी आहे.



किम जोंग यांच्या विमानाच्या आतमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. या विमानात किम जोंग काम करतात तसंच बैठकाही घेतात. विमानात किम जोंग यांचे काही फोटोही आहेत. हे विमान २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात चर्चेत आलं. उत्तर कोरियाचं ऑलम्पिक प्रतिनिधी मंडळ दक्षिण कोरियाला गेलं होतं. यामध्ये किम जोंग यांची बहिण किम यो-जोंगही होती.


किम जोंगचे वडिल किम जोंग इल आणि त्यांचे आजोबा किम-II यांना विमानाची भीती असल्यामुळे ते विमान प्रवास करायचे नाहीत. पण किम जोंग-उन मात्र विमान प्रवासाला घाबरायचे नाहीत. २०१५ साली उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्त वाहिनीवर किम जोंग यांचे स्वदेशी विमान आणि दोन पंखाच्या एएन-२ मिलट्री विमान उडवतानाचे व्हिडिओ समोर आले.


किम जोंग-उनची मर्सिडीज बेंज


चीन आणि सिंगापूर दौऱ्यावर असताना किम जोंग-उननी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी स्वत:च्या मर्सिडीज बेंज एस क्लास या गाडीचा वापर केला होता. ही गाडी खास किम जोंग यांच्यासाठीच तयार करण्यात आली आहे. २०१० साली ही गाडी बनवण्यात आली. या गाडीवर जवळपास १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. कोरियाच्या शिखर संमेलनादरम्यान या गाडीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. लांबच्या दौऱ्यांमध्ये अडचण होऊ नये, म्हणून किम जोंग यांच्या ताफ्यात एक टॉयलेट कारही असते.



किम जोंगचं पोर्टेबल टॉयलेट


सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या किम जोंग यांची सोय जरी सेंट रेगीस या पंचतारांकीत हॉटेलमध्ये झाली होती, तरी त्यांनी स्वतः सोबत स्वतःचं पोर्टेबल टॉयलेट आणलं होतं. असंच टॉयलेट त्यांनी याआधी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भेटतानाही सोबत नेलं होतं. एवढंच नाही तर अगदी उत्तर कोरियातही फिरताना तो स्वतःचं टॉयलेट घेऊन फिरतात. स्वतःच्या विष्ठेतून आपल्या आयुष्यातली गुपीतं परदेशी गुप्तहेर शोधून काढतील, अशी भीती किम जोंगना वाटते. किम जोंगना असलेल्या विकारांचा याद्वारे शत्रूंना शोध लागला, तर त्याचा गैरफायदा घेतला जाईल, अशी भीती त्यांना सतावते. म्हणून किम जोंग ऊन जिथे जातात तिकडे त्यांचं स्वतःचं पोर्टेबल टॉयलेट असतं. 


बोट आणि पाणबुड्या



उत्तर कोरियामध्ये किम जोंगला अनेकवेळा बोट, पाणबुडी, बस आणि स्की लिफ्टनं प्रवास करताना बघण्यात आलं आहे. मे २०१३ मध्ये जेव्हा सरकारी माध्यमांनी किम जोंग उनचा फिशिंग स्टेशनवरचा फोटो छापला होता, तेव्हा किम जोंगच्या मागे एक बोट दिसली होती. जवळपास ४७ कोटी रुपयांची ही बोट किम जोंगची आहे का नाही याबाबत मात्र कोणालाही माहिती नाही.