नवी दिल्ली - कोणत्याही कंपनीला आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी जाहिरात करावीच लागते. जाहिरातीशिवाय संबंधित उत्पादनाबद्दल त्याच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल ग्राहकांना काहीच कळत नाही. त्यामुळे जाहिरातसाठी सर्वच कंपन्या मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात. आतापर्यंत पारंपरिक माध्यमातून जाहिरात होत होती. पण आता त्यापलीकडे जाऊन इतरही माध्यमातून जाहिराती करण्यात येऊ लागल्या आहेत. वृत्तपत्र, टीव्ही, रेडिओ, होर्डिंग्ज यासह आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जाहिराती करण्यात येऊ लागल्या आहेत. जाहिरातींचे हे विश्व खऱ्या अर्थाने विश्वरुपी होणार असून आता आकाशात जाहिराती दिसू शकणार आहेत. त्यामुळे जगातील मोठ्या भागातील लोकांना एकाचवेळी संबंधित जाहिरात आकाशात दिसू शकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियातील एका स्टार्टअप कंपनीने या स्वरुपाच्या जाहिराती करण्याची चाचणी सुरू केली आहे. या जाहिरातींमध्ये आकाशात बिलबोर्ड्स प्रस्थापित केले जातील आणि ज्याप्रमाणे आपल्याला चंद्र आणि चांदण्या दिसतात. त्याचप्रमाणे आता आकाशात वर बघितल्यावर जाहिरातीही दिसू शकतील. स्टार्टरॉकेट असे या स्टार्टअप कंपनीचे नाव आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लाड स्टिनिकोव्ह म्हणाले की, अवकाशात पाठविण्यात आलेल्या डिस्को बॉल प्रोग्राममुळे मी खूप प्रभावित झालो आणि त्यातूनच आकाशात जाहिरात करण्याची कल्पना मला सुचली. गेल्यावर्षी कॅलिफोर्नियातील रॉकेट लॅबने डिस्को बॉल अवकाशात पाठवले होते. छोट्या छोट्या उपग्रहांच्या माध्यमातून अतंरिक्षात उपयोगी येतील असे बिलबोर्ड्स तयार करण्याची कंपनीची कल्पना आहे. अंतराळयानाच्या माध्यमातून ते अवकाशात पाठवले जातील. अवकाशात हे बिलबोर्डस फिरत राहतील आणि रात्रीच्या वेळी चमकतील जे पृथ्वीवरून दिसू शकतील. 


दरम्यान, कंपनीच्या या प्रस्तावावर अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतला आहे. अशा पद्धतीने अवकाशातील उपग्रहांची वाहतूक वाढविणे अत्यंच चुकीचे असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. यामुळे उपग्रह एकमेकांना धडकण्याची शक्यता वाढू शकते. त्याचबरोबर अशा प्रकल्पांमुळे अंतरिक्षातील कचराही वाढू शकतो.