`तो घाबरलेला, त्याला पाणबुडीत जायचं नव्हतं पण...`; मृत पाकिस्तानी पिता-पुत्राबद्दल मोठा खुलासा
OceanGate Suleman Dawood Death: या पाणबुडीच्या अपघातामध्ये मरण पावलेल्या 5 प्रवाशांमध्ये सर्वात कमी वयाचा प्रवासी हा मुलगा होता. मूळचा पाकिस्तानी असलेला हा तरुण केवळ 19 वर्षांचा होता
OceanGate Suleman Dawood Death: टायटन नावाच्या पाणबुडीमधून टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या प्रवाशांमध्ये पाकिस्तानचे उद्योगपती शहजादा दाऊद (Shahzada Dawood) आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊदचाही (Suleman Dawood) समावेश होता. सुलेमान हा केवळ 19 वर्षांचा होता. तो या पाणबुडीमधील सर्वात कमी वयाचा प्रवाशी होता. या दुर्घटनेनंतर सुलेमानच्या आत्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. सुलेमान हा या पाणबुडीमध्ये जाण्याआधी फार घाबरलेला होता. केवळ आपल्या वडिलांमुळे सुलेमान भिती वाटत असूनही या पाणबुडीने टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेला होता.
त्याला भिती वाटत होती पण...
46 वर्षीय शहजादा दाऊदची बहीण अजमेह दाऊद यांनी पाणबुडी रवाना होण्याआधी त्या सुलेमानशी फोनवरुन बोलल्या होत्या. अजमेह यांनी एनबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात खुलासा केला आहे. "सुलेमान फार घाबरलेला होता. मात्र फादर्स डेच्या विकेण्ड त्याला त्याच्या वडिलांबरोबर राहायचं होतं. त्यामुळेच त्याने भिती वाटत असूनही या पाणबुडीने खोल पाण्यात जाण्याचा निर्णय घेतला," असं अजमेह यांनी सांगितलं.
लहानपणापासूनच होती टायटॅनिकचं उत्सुकता
अजमेह यांनी लहानपणापासूनच शहजादा दाऊद यांना टायटॅनिकसंदर्भात आकर्षण होतं. शहजादा दाऊद यांनी याच उत्साहापोटी आपलं तिकीट बूक केलं होतं. मात्र शहजादा यांचा मुलगा सुलेमान हा या पाणबुडीमधील ट्रीपसाठी मानसिक दृष्ट्या 'पूर्णपणे तयार नव्हता', असा दावा अजमेह यांनी केला आहे.
1600 फूट दूर सापडली बुडालेली पाणबुडी
'ओशनगेट' (OceanGate) या कंपनीची पाणबुडी रविवारपासून बेपत्ता झाली होती. या बोटीमध्ये 96 तासांचा ऑक्सिजन उपलब्ध होता, असं सांगण्यात येत होतं. पाण्यामध्ये गेल्यानंतर अवघ्या 2 तासांमध्ये या पाणबुडीचा संपर्क तुटला होता. यानंतर अमेरिकेच्या कोस्टगार्डपासून अनेक यंत्रणा या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी कार्यरत होत्या. गुरुवारी या पाणबुडीचे अवशेष सापडले असून 'ओशनगेट'ने पाणबुडीमधील 5 ही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं पत्रक जारी केलं होतं. टायटॅनिक ज्या ठिकाणी बुडाली आहे त्या ठिकाणापासून 1600 फूट दूर या पाणबुडीचे अवशेष सापडल्याचं अमेरिकी कोस्ट गार्डने जाहीर केलं. या पाणबुडी आकुंचन पावल्याने तिचा शोध घेणाऱ्या टीमने म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं असावं?
जर्नल ऑफ फिजिक्स या कॉन्फरन्स सीरीजच्या दाव्यानुसार पाणबुडीचा अपघात कॅटस्ट्रॉपीक इन्पोजन म्हणजेच नैसर्गिक दबावामुळे एखादी गोष्ट आकुंचन पावण्याची घटनेमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फारच कमी वेळात हे सारं घडलं. पाणबुडीचा संपर्क तुटल्यानंतर अवघ्या मिलीसेकंदांमध्ये पाणबुडी आकुंचन पावली आणि त्यामधील सर्व प्रवासी मेले. मात्र हे असं नेमकं का घडलं याची माहिती समोर आलेली नाही.