एका फोटोने `त्या` मुलीची झाली सुटका !
फोटोग्राफरला कोणत्या गोष्टीत सौंदर्य दिसेल, हे आपण सांगू शकत नाही. त्यांची दृष्टीच तशी वेगळ्या ढंगात विकसित झालेली असते.
बांग्लादेश : फोटोग्राफरला कोणत्या गोष्टीत सौंदर्य दिसेल, हे आपण सांगू शकत नाही. त्यांची दृष्टीच तशी वेगळ्या ढंगात विकसित झालेली असते. अशाच एका बांग्लादेशी फोटोग्राफर जीएमबी आकाशने एका मुलीचे फोटो काढले. त्या मुलीला १० वर्ष साखळीने बांधून ठेवण्यात आले होते. काढलेले फोटोज त्याने सोशल मीडियावर अपलोड केले. मात्र त्याचा काय परिणाम होईल हे त्याच्या डोक्यातही नव्हते.
त्याच्या त्या फोटोची दखल घेऊन अनेकजण त्या मुलीच्या मदतीसाठी सरसावले. आणि त्या मुलीचे आयुष्यच बदलून गेले. नेमके त्या फोटोमध्ये आहे तरी काय ?
त्या मुलीला तिच्या वडिलांनी साखळीने बांधून ठेवले होते. पण त्यांनी असे का केले ? हे आकाशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. या मुलीला अमली पदार्थांचे व्यसन होते. त्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने वडील घरात नसताना त्या मुलीला काही झाल्यास काय करणार ? या चिंतेपोटी वडिलांनी तिला साखळीने बांधून ठेवले होते.
मात्र त्या फोटोमुळे मुलीला मदतीचा ओघ सुरु झाल्याने आकाश पुन्हा त्या मुली आणि तिच्या वडिलांपर्यंत पोहचला. त्याने तिच्या वडिलांशी चर्चा करून त्या दोघांनीही भाजी विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. आणि ती देखील वडिलांना कामात आनंदाने मदत करू लागली.
भाजी विक्रीतून या दोघांना महिन्याला चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. तसेच या मुलीला घरात एकटीला राहावे लागत नाही. यावरून असे दिसून येते की, सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम देखील घडतात. मुलीच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींचे या फोटोग्राफरने फेसबुक आभार मानले आहेत. त्याचबरोबर मुलीची व्यसनाच्या विळख्यातून सुटका झाल्याचा आनंदही त्याने व्यक्त केला.