सिडनी : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्यांच्याच हद्दीत घुसून थेट हवाई दलामार्फत कारवाई केली. 'जैश'च्या दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ला करत तळ नष्ट केलेत. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे तळ आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. हे वारंवार सांगूनही पाकिस्तानचा उलट्याबोंबा सुरुच होत्या. मात्र, भारताने पुलवामा हल्ल्यानंतर चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे स्पष्ट केले होते. त्यानंतर मंगळवारी पहाटे हवाई कारवाई करत दहशतवाद्यांचे कॅम्प नष्ट केले. आता पाकिस्तानवर ऑस्ट्रेलियानेही दबाव आणला आहे. त्याआधी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव वाढविला होता. अमेरिकेबरोबरच आता ऑस्ट्रेलियाने दहशतवादी तळांवर तात्काळ कारवाई करण्याच सल्ला दिला आहे. पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत कार्यरत असणाऱ्या दहशतवादी गटांवर कारवाई करावी, असा सल्ला ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मारिस पायने यांनी हा सल्ला दिला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान हद्दीत कार्यरत असणाऱ्या दहशतवादी गटांबाबत आणि जैश या संघटनेवरही पाकिस्तानने कारवाई करायला हवी. कारण त्यांनी पुलावामा येथील १४ फेब्रुवारीच्या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. त्यामुळे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना सोडता कामा नये. तसेच मुलतत्ववादी गटांना पाकिस्तानने आपल्या हद्दीत थारा देऊ नये, असेही पायन यांनी पाकिस्तानला बजावले आहे.



पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंध ताणले गेले आहेत. भारताने थेट पाकिस्तान हद्दीत घुसून कारवाई केल्याने संबंध अधिकच ताणले गेले आहेत. यावर ऑस्ट्रेलियाने चिंता व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाने या हल्ल्याचा निषेधही नोंदवला आहे. दोन्ही देशांनी अशा स्वरुपाच्या कारवाया टाळल्या पाहिजेत. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा करावी. दोघांमध्ये जे काही वाद त्यांनी शांततेत सोडवावेत. दहशतवाद्याला खतपाणी घालणे योग्य नाही, असेही मारिस पायने यांनी म्हटले आहे.