दाऊद कराचीमध्येच, पाकिस्तानची पहिल्यांदाच जाहीर कबुली
मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्येच असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने दिली आहे.
इस्लामाबाद : मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्येच असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने दिली आहे. लवकरच दाऊदवर कारवाई होईल, असं आश्वासनही पाकिस्तानने दिलं आहे. पाकिस्तानने दहशतवादी कारवायांशी जोडल्या गेलेल्या ८८ नेते आणि दहशतवादी गटांशी जोडल्या गेलेल्या सदस्यांवर कारवाई केली आहे. या ८८ जणांची यादी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जाहीर केली आहे. या यादीमध्ये दाऊद इब्राहिम, जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आणि जकीउर रहमान लखवी यांच्या नावाचा समावेश आहे.
दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचं पाकिस्तानने पहिल्यांदाच मान्य केलं आहे. कराचीशिवाय पाकिस्तानने दाऊद इब्राहिमचे तीन पत्ते जाहीर केले आहेत.
व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिप्टन रोड कराची
हाऊस नंबर ३७, ३० स्ट्रीट डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी, कराची
हवेली, नुराबाद, कराची
मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांची संपत्ती आणि बँक खाती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पॅरिसच्या एफएटीएफने जून २०१८ मध्येच पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं होतं, आणि पाकिस्तानला २०१९च्या शेवटापर्यंत कार्ययोजना लागू करायला सांगितलं होतं, पण कोरोना व्हायरसमुळे ही डेडलाईन वाढवण्यात आली होती.
ऑक्टोबर महिन्यात फायनानशियल ऍक्शन टास्क फोर्सची बैठक होणार आहे. पाकिस्तान अजून एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये आहे. पण पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध पाहता, त्यांना ग्रे लिस्टमधून ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे पाकिस्तानची दहशतवाद्यांवर कारवाई म्हणजे फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर धुळफेक असल्याचं बोललं जातंय.