Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफचे (Tehreek-e-Insaf) अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तोशखाना प्रकरणी पोलीस त्यांना बेड्या ठोकण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूीवर पोलिसांनी इम्रान खान  यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. पोलिसांनी या रस्त्यांवर कंटेनर आणि दंगल पथकांना तैनात केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस इम्रान खान यांना अटक करण्याची शक्यता असल्याने इम्रान खान यांचे समर्थकही त्यांना विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले आहेत. पीटीआयचे नेते फारुख हबीब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, कोणत्याही परिस्थितीत इम्रान खान आत्मसमर्पण करणार नाहीत असं सांगितलं आहे. "महिला न्यायाधीशाला धमकावल्याच्या प्रकरणातील अटक वॉरंट इस्लामाबाद हायकोर्टाने आज रद्द केला आहे. आता त्यांच्याकडे काय नवीन आहे पाहूयात," असं हबीब म्हणाले आहेत. 


दरम्यान, इस्लामाबादमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपलं पथक तोशखाना प्रकरणी अटक करण्यासाठी आलं असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान पोलिसांनी जर इम्रान खान यांना अटक केली तर समर्थकांसह संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. 


सोमवारी लाहोर पोलिसांनी इम्रान खान यांच्याविरोधात पीटीआय कार्यकर्त्याच्या मृत्यू प्रकऱणी गुन्हा दाखल केला. अली बिबाल उर्फ जिल्ले शाह असं या कार्यकर्त्याचं नाव असून रस्ते अपघातात त्याने जीव गमावला. याआधी लाहोर पोलिसांनी इम्रान खान आणि इतर 400 जणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 


एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “इम्रान खान, फवाद चौधरी, डॉ. यास्मिन रशीद आणि इतरांविरोधात हत्येला प्रवृत्त केल्याबद्दल, जिल्ले शाहच्या मृत्यूशी संबंधित तथ्ये आणि पुरावे लपवल्याबद्दल नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे”. वरिष्ठ पातळीवरुन आदेश मिळाल्यानंतर इम्रान खान आणि इतरांना अटक केली जाऊ शकते असंही त्यांनी सांगितलं आहे. पीटीआयने मात्र पोलिसांवरच छळ करत शाहची हत्या केल्याचा आरोप केला आहे. 


देशात नवं सरकार स्थापन झाल्यापासून इम्रान खान यांच्याविरोधात दाखल झालेला हा 81 वा गुन्हा आहे. 


याआधी 5 मार्चला इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणी अटक करण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलीस अटक वॉरंट घेऊन इम्रान खान यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. 


तोशखाना प्रकरण नेमकं काय आहे? 


तोशखाना हे पाकिस्तान सरकारमधील एका शासकीय विभागाचं नाव आहे. संविधानिक पदावर असताना मिळालेल्या भेटवस्तू संबंधितांना या विभागात जमा करायच्या असतात. इम्रान खान पंतप्रधानपदी असताना त्यांना अनेक मौल्यवान गोष्टी भेटवस्तू म्हणून मिळालेल्या होत्या. पण त्यांनी त्या तोशखानात जमा न करता त्या विकून पैसे मिळवल्याचा आरोप आहे.