नवी दिल्ली : हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आज भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय वकिलातीतल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना आज जाधव यांना भेट मिळेल, असं वृत्त आहे. मात्र यासाठी पाकिस्ताननं काही अटी घातल्या आहेत. या भेटीवेळी पाकिस्तानी अधिकारीही उपस्थित असतील आणि सर्व भेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साक्षीनं होईल, अशा दोन अटी कुलभूषणपर्यंत पोहचण्यासाठी पाकिस्ताननं भारतासमोर ठेवल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या दोन अटींमुळे कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव तयार करण्याचाही पाकिस्तानचा एक प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडावर स्थगिती आणत जाधव यांना पाकिस्तानने तातडीने राजनैतिक भेटीचा अधिकार द्यावा, असे आदेश दिले होते. 


त्यानुसार १७ जुलैला पाकिस्तानने राजनैतिक भेटीचा अधिकार देण्याचं मान्य केलं. मात्र आता अटी लादण्यात आल्यामुळे भारताची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं आहे.



याबाबत पाकिस्तानकडून प्रस्ताव आला असून त्याला राजनैतिक मार्गानं उत्तर दिलं जाईल, एवढंच भारतीय परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय. 'मी पद्धतीच्या विस्तारीत स्पष्टीकरणावर जाणार नाही. पण आम्हाला पाकिस्तानकडून एक प्रस्ताव मिळालाय आणि आम्ही आयसीजेचा निर्णय समोर ठेवून याचं मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतोय. राजनैतिक मार्गानं पाकिस्तानसोबत संवाद सुरू राहील' असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्लीत मीडियासमोर म्हटलंय.