भारतानं पुलवामासारख्या हल्ल्यांना आमंत्रण दिलं - इमरान खान
`काश्मीरच्या जनतेला पायदळी तुडवण्यात नरेंद्र मोदी सरकार कधीही यशस्वी होणार नाही`
इस्लामाबाद : भारतातल्या संसदेतल्या दोन्ही सभागृहात जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक मोठ्या बहुमतानं मंजूर झालंय. सोमवारी राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आज लोकसभेत हे विधेयक ३७० विरुद्ध ७० अशा मतांच्या मोठ्या फरकानं मंजूर झालं. दुसरीकडे भारताच्या या अंतर्गत निर्णयाचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेतही उमटलेले पाहायला मिळाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतानं उचललेल्या या पावलावर आपला आक्षेप व्यक्त केला. आम्ही हा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर घेऊन जाऊ, असंही त्यांनी म्हटलंय.
'भारताच्या या निर्णयामुळे काश्मीरमधली परिस्थिती आणखीनच चिघळू शकते. अनुच्छेद ३७० सोबत छेडछाड करत भारतानं पुलवामासारख्या आणखीन हल्ल्यांना आमंत्रण दिलंय' असंही यावेळी इमरान खान यांनी म्हटलं. त्यानंतर लगेचच स्वत:ला सावरत पाकिस्तानचा पुलवामा दहशतवादी हल्याशी कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
'भारतीय जनता पार्टीनं आपल्या संस्थापकांच्या 'जातीयवादी' विचारधारेवर काम केलंय. त्यांनी नेहमीच मुस्लिमांना 'सेकंड क्लास सिटीझन' मानलंय. परंतु, काश्मीरच्या जनतेला पायदळी तुडवण्यात नरेंद्र मोदी सरकार कधीही यशस्वी होणार नाही' असंही इमरान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत म्हटलंय.
अनुच्छेद ३७० बद्दल बोलतानाच त्यांनी मोहम्मद अली जिन्ना यांचीही आठवण काढली. 'आरएसएसला भारतात केवळ हिंदू हवेत आणि तिथं मुस्लिमांना दुसरा दर्जाचं नागरिक मानलं जाईल... इंग्रजांनंतर हिंदुंची गुलामी करावी लागेल, हे कायदेआझम जिन्ना यांनी आधीच हेरलं होतं. आज तीच गोष्ट खरी ठरतेय. जे लोक दोन नेशन थिअरी मानत नव्हते, तेच लोक आज म्हणतायत दोन नेशन थिअरी योग्य होती. भारतानं नेहमीच हिंदुंना महत्त्व दिलंय. तर पाकिस्तानात सर्वच व्यक्तींसाठी समानतेवर आधारित राहील' अशी वाचाळ बडबडही इमरान खान यांनी यावेळी केली.